Friday, 28 August 2026

आगळे वेगळे पुणेकर - किस्सा क्र. १ - होराभूषण काका आणि खड्ड्याची कुंडली 🔮🚗

 


पुण्यातले एक काका आहेत. होराभूषण काका. त्यांचा एक अफलातून किस्सा सांगतो.  

हे काका मनपाकडे (महापालिकेकडे) तक्रार करून आपला मौल्यवान वेळ कधीच वाया घालवत नाहीत.

काकांचं अगदी स्पष्ट मत आहे, "अरे, महापालिकेचे अधिकारी नागरी कायद्यानुसार चालतच नाहीत. ते चालतात ग्रहांच्या चालीवर . कधी राहूसारखं फाईल गायब करणं, कधी शनीसारखं कामाला साडेसात वर्ष लावणं, तर कधी मंगळासारखं विनाकारण लालफितीत अडकवणं ."

मागच्या पावसाळ्यात आमच्या सोसायटीच्या अगदी मुख्य दरवाजासमोर गाडीचे शॉकऍबसॉरबर तोडणारा खड्डा पडला होता. सोसायटीतली तरुण मुलं मनपाला आणि स्थानिक नगरसेवकाला ट्विटरवर टॅग करून थकले, पण खड्डा काही बुजेना.

शेवटी काका मैदानात उतरले.

काका हातात मोजपट्टी घेऊन खाली गेले. त्यांनी खड्ड्याची लांबी-रुंदी मोजली, खोली नोंदवली; खड्डा पडल्याची वेळ टिपली आणि तात्काळ शनीच्या ग्रहाची स्थिती तपासून एक अतिशय अचूक गणित मांडलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर जाणाऱ्या पुणेकरांना रस्त्यावर एक विलोभनीय दृश्य दिसलं. त्या खड्ड्याच्या मध्यभागी काकांनी छानशी पिवळी, लॅमिनेटेड कुंडलीची पाटी रोवली होती.

त्यावर स्वच्छ, मोकळ्या अक्षरांत लिहिलं होतं:

नांव: बर्वे रोडचा खड्डा

जन्म वेळ: १२ जुलै (राहूच्या महादशेत)

सध्याचे निदान: प्रशासकीय अनास्थेचा तीव्र योग

बुजण्याचा संभाव्य मुहूर्त: १४ नोव्हेंबर २०२८ (ज्या दिवशी गुरु ग्रह चौथ्या स्थानात प्रवेश करेल आणि मनपाच्या अभियंत्याचा आत्मा जागा होईल!)

टीप: कृपया २०२८ पर्यंत गाड्या हळू चालवाव्यात. ग्रहांची शांती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बस! लोकांचे दुचाकींवरून फोटो काढणे सुरू झाले. व्हॉट्सॲप ग्रुप्सवर 'खड्डा कुंडली' तुफान व्हायरल झाली. दोन दिवसांत स्थानिक न्यूज चॅनेल्सवर बातम्या आल्या!

तिसऱ्या दिवशी सकाळी महापालिकेची डांबराची गाडी खडबडून जागी होऊन खड्डा बुजवायला आली.

काका आपल्या बाल्कनीत उभं राहून निवांत चहाचे घोट घेत होते. त्यांनी हातातल्या घड्याळाकडे पाहिलं, मान हलवली आणि वरूनच कंत्राटदाराला हाक मारली:

"अहो कंत्राटदार महाशय! आज कुठल्या मुहूर्तावर खड्डा बुजवताय? शनी अजून वक्री आहे! आज डांबर ओतलं, तर शुक्रवारी नळस्टॉपजवळ राहू दोन नवीन खड्डे तयार करेल!"

कंत्राटदाराने काकांकडे भीतीयुक्त आदराने पाहिलं, पाच मिनिटांत डांबर दाबून खड्डा बुजवला आणि गाडी काढून पळ काढला!

आहे की नाही पुणेरी दणका!

लवकरच पुण्यात खड्डे बुजवणे पार्टी (KBP) उदयास येईल असा कयास आहे. 

माझी धाकटी बहीण होराशास्त्री Padmaja Kundaji हिला हा किस्सा समर्पित.

About Me

My photo
Bangalore, Karnataka, India
My purpose is to manufacture success and happiness