TenMG

Friday, 16 October 2026

आगळे वेगळे पुणेकर - किस्सा क्र. १५ - फक्त पेशवाई पदार्थ🍽️

 


आजचा किस्सा प्रिया-मंदार ह्या संशोधक दाम्पत्याचा. 

प्रिया आणि मंदार कोटस्थाने तसे पुण्याचेच. पण मंदारच्या नोकरीमुळे त्यांना देशात, परदेशात बरंच फिरावं लागलं. 

प्रत्येक ठिकाणी प्रियाच्या हातच्या चविष्ट खाद्यपदार्थांमुळे ते तिथल्या मराठी कुटुंबांचे भाग बनले.

पुण्याला परतल्यावर त्यांचा एक अमेरिकन मित्र त्यांना भेटायला आला होता. पुणं दाखवताना ते त्याला बंड गार्डनच्या पेशवा दफ्तरला घेऊन गेले. तिकडे त्यांना १७८३ मध्ये झालेल्या सवाई माधवराव पेशवे यांच्या विवाह सोहळ्याबद्दलचं नाना फडणवीसांचं एक २२ पानी हस्तलिखित हाती लागलं. एका ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे 'पान-विडे' बनवण्याची पद्धतही नमूद केली होती. इतकं ते सविस्तर होतं.

मंदारच्या मनात विचार घोळू लागले. फडणवीसांच्या हस्तलिखिताचा काही तरी उपयोग व्हायला हवा हे त्यानं नक्की केलं.

प्रियाशी चर्चा करताना, “आपण फक्त पेशवाई खाद्य पुरवायचं” हा विषय पक्का झाला.

मग संशोधनाला सुरुवात झाली. 

१. त्यावेळी कुठलं रॉ मटिरियल उपलब्ध होतं?

२. पेशवे दिवसभर काय खायचे आणि प्यायचे?

३. त्यावेळी कुठल्या प्रकारची भांडी स्वयंपाकासाठी वापरत?

वगैरे       

ह्या संशोधनात त्यांना बरीच आगळी वेगळी माहिती मिळाली - 

पेशवेकालीन रॉ मटिरियल - 

१. शिवाजी महाराजांनी ठेचा खाल्ला असल्याची शक्यता आहे (कारण मिरची पोर्तुगीजांनी भारतात १६व्या शतकात आणली होती), पण टिळकांनी साबुदाण्याची खिचडी खाल्ली नव्हती हे नक्की (साबुदाणा खऱ्या अर्थाने १९४० आणि १९५० च्या दशकात लोकांच्या रोजच्या आहारात आणि उपवासाच्या पदार्थांमध्ये आला)

२. फ्लॉवर, फरसबी, मटार, गाजर, बीट वगैरे पेशव्यांनी ऐकलं नव्हतं. टॉमॅटो नक्की खाल्ला नव्हता (टॉमॅटो जेव्हा भारतात आला तेव्हा त्याला मांसफळ असं म्हणत)

३. पेशव्यांनी बटाट्याचा कीस खाल्ल्याचं आपल्या संशोधक दाम्पत्याला कुठे आढळलं नाही (बटाटा भारतात १७व्या शतकात आला पण पुण्याला यायला त्याला दोनशे वर्षं लागली)

पेशवे दिवसभर काय खायचे आणि प्यायचे? - 

१. फक्त दोन जेवणं (सकाळी १० ते १२, रात्री ७ ते ९)  आणि मधे ताक, सरबत, उसाचा रस, फळं (अफगाणिस्तान मधून बरीच फळं पुण्यात येत) वगैरे  

२. बेत - वरण भात तूप,  भाकरी, दही/ ताक. पावसाळी भाज्या - कंटोळी, टाकळा इत्यादी. हिवाळी भाज्या - मुळा, मेथी इत्यादी. उन्हाळी भाज्या - भोपळा, अळू वगैरे. गोड  धोड - पुरण पोळी किंवा श्रीखंड. आणि नंतर त्रयोदशगुणी विडा.

३. उपवासाच्या दिवशी शिंगाडे, रताळे वगैरे   

४. आहारावर वैद्यांचं बारीक लक्ष असे. आयुर्वेदानुसार आहार घेतला जायचा

नंतर प्रिया-मंदारनं रघुनाथ नवहस्ते ह्यांच्या ‘भोजन कुतूहलं’ ग्रंथाची पारायणं करून त्यांच्या ४०० पाककृती ‘हाताळल्या’; अहो, पाक साहित्यसुद्धा रघुनाथशास्त्रींच्या पद्धतीनं मोजून (म्हणजे वजनासाठी ग्रॅम नाही, गुंज-मासा… आणि द्रव साहित्यासाठी शाण-शुक्ती इत्यादी) प्रॅक्टिस केली. हे म्हणजे अल्टिमेट!

आणि ह्या सर्व संशोधनानंतर कोटस्थाने दाम्पत्याचं ब्रॅंडिंगवर काम सुरु झालं, मेन्यू ठरवला आणि भगीरथ प्रयत्नांती “फक्त पेशवाई पदार्थ” पुणेकरांसमोर सादर झाला.

लोकांनी ‘फक्त’ हा शब्द काढून टाकण्यासाठी बरीच घासाघीस केली. पण प्रिया-मंदार बधले नाहीत. नाना फडणवीसांचं हस्तलिखित अमर करणं हा त्यांचा हट्ट होता. 

आणि अशा रीतीनं, प्रिया-मंदारच्या परिश्रमांमुळे, नाना फडणवीसांच्या २२ पानी लेखनाचं चीज झालं आणि रघुनाथशास्त्र्यांना पब्लिसिटी लाभली.

आणि ज्या अमेरिकन मित्रामुळं हे रामायण घडलं, त्याला प्रिया-मंदारनी रघुनाथ शास्त्र्यांची कृती वापरून केलेले शंखपाळ (शंकरपाळी) धाडून दिलं आणि सोबत एक भलं मोठं थँक्यू पत्रही.

हा किस्सा खऱ्याखुऱ्या प्रिया-मंदारना समर्पित. किस्सा काल्पनिक आहे; पण प्रियाच्या हातची चव खरी आहे आणि मंदारचा संशोधनाचा उत्साहही खरा आहे😋.

आगळे वेगळे पुणेकर - किस्सा क्र. १४ - होमगार्ड काकू👮

 



मीरा काकूंनी निवृत्त झाल्यावर सोसायटीतल्या मुलींना इस्रायली स्वसंरक्षण तंत्र - क्रॅव्ह मागा (Krav Maga) या पद्धतीचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली होती. 

मुलींचा आत्मविश्वास वाढत होता. पालकही खूष होते आणि काकूंचा वेळ सार्थकी लागत होता.

क्रॅव्ह मागाचा तास संपल्यावर मीराकाकू आपले अनुभव मुलींना सांगत. 

काकूंचं आयुष्य म्हणजे ‘ऍक्शन’. त्या पूर्वी फुटबॉल खेळायच्या, नंतर फुटबॉल पंच (Referee) होत्या. बरीच वर्षं त्यांनी होम गार्ड म्हणून काम केलं होतं. 

काकूंच्या विनोदी स्वभावामुळे त्यांचे अनुभव ऐकायला मुलींना फार आवडायचं. काकूंचे दिवस छान चालले होते.

पण लवकरच त्यांच्या आयुष्याला एक कलाटणी मिळणार होती.

त्याचं असं झालं, काकूंच्या सोसायटीच्या जवळचा चौक म्हणजे अतिवाहतूक कोंडी (traffic jam). वैतागलेले वाहन चालक, भांडणं, हॉर्नचा गोंगाट. बरं चौकात सिग्नल नव्हता. त्यामुळे गोंधळ हाताबाहेर गेला होता.

मुलींनी काकूंना ट्रॅफिक जॅमचा गुंता सोडवण्याची कल्पना सुचवली. काकूंना कल्पना आवडली. 

“पण तुम्हीपण यायला पाहिजे मदतीला.”, ह्या काकूंच्या वाक्याला मुलींचा होकार मिळाला.

टीम तयार झाली. ऐन गर्दीच्या वेळी ट्रॅफिकचा गुंता सोडवणारी टीम चौकात दिसायला लागली. 

गणवेशातल्या काकू आणि मुलींचं काम पाहून लोक कौतुक करायला लागले.

एका मुलीने अजून एक आयडिया सुचवली, “काकू, तुम्ही फुटबॉलच्या पंच होतात. तेव्हा तुम्ही हिरवी, लाल कार्डं वापरायच्या. तसं करूया. मज्जा येईल.” काकू म्हणाल्या, “अगं, फुटबॉलमध्ये हिरवं कार्ड नसतं. पिवळं असतं.” “ठीक आहे. आपण पिवळ्याऐवजी हिरवं वापरू.” सगळ्यांना कल्पना रुचली.

आता चौकात मजेदार दृश्य दिसायला लागलं - काकूंच्या तोंडात शिट्टी, हातात हिरवी लाल कार्डं, मुलींजवळ भोपू आणि कायदा मोडणाऱ्याचा फोटो काढायला मोबाईल.

हॉर्न वाजवणाऱ्या चालकाला लाल कार्ड, शांत चालकाला हिरवं कार्ड, दुचाकी दामटवणाऱ्यांचे फोटो हे दृश्य बघायला बघ्यांची गर्दी जमायला लागली.

एक फरक नक्की झाला. हिरव्या कार्डांची  संख्या हळूहळू वाढायला लागली.

काकू आणि त्यांची टीम फेमस झाली. 

मुलींना प्रत्यक्ष क्रॅव्ह मागा वापरायची वेळ कधी आली नाही पण त्यांच्या वागण्यावरून ‘क्रॅव्ह मागा आत्मविश्वास’ नक्कीच दिसत होता.

आता मला सांगा, पोलीस आयुक्तांनी त्यांची पाठ थोपटली असेल? की “ही नाटकं बंद करा” अशी तंबी दिली असेल?

अहो, त्यांनी चक्क मीरा काकू आणि त्यांच्या कंपूला वाहतूक नियंत्रणासाठी प्रशिक्षण देण्याचं आमंत्रण दिलं. आता बोला.

क्रॅव्ह मागा शिकवता शिकवता काकू आता वाहतूक नियंत्रणही शिकवणार होत्या!

आवडला का पुणेरी काकूंचा किस्सा?

काही सुज्ञ वाचक प्रश्न करतील - 

१. काकू हे काम २४ तास करायच्या का? मुली रोज चौकात; मग त्यांचा अभ्यास कधी होणार?

२. मुलींनी फोटो काढले, पण लोकांच्या परवानगीशिवाय. हे गोपनीयतेचं उल्लंघन नाही का?

३. आणि सगळे चालक थांबले? पुण्यात? गोष्ट खोटी वाटते!

४. फुटबॉलमध्ये रेफरीला दोन्ही संघ शिव्या घालतात, चौकात हे झालं नाही का?

५. चौकात सिग्नल का नव्हता, हे विचारायला काकूंना पोलीस आयुक्तांकडे जायला हवं होतं. कायदा हातात घेणं बरोबर आहे का?

६. पिवळं कार्ड बाद करून हिरवं आणलं, मग पिवळ्या कार्डांचं काय केलं? महापालिकेकडे जमा?

७. काकूंचा गणवेश कोणी शिवला? त्याचं टेंडर निघालं होतं का?

गोखले इन्स्टिट्यूटच्या वर्तन शास्त्राच्या प्राध्यापिका डॉ. सविता कुलकर्णी ह्यांना वरचे प्रश्न पाठवायचा विचार करतोय. उत्तरांसाठी.

हा किस्सा त्यांना समर्पित.

Sunday, 11 October 2026

आगळे वेगळे पुणेकर - किस्सा क्र. १३ - वार्ताहर ग्रुप 📚


पुण्यातल्या काही काकांचा एक व्हॉट्सऍप ग्रुप आहे. 

बऱ्याच ग्रुपप्रमाणे इथेसुद्धा गुड मॉर्निंग, गुड नाईट आणि बातम्यांच्या फॉरवर्डचा सपाटा असायचा.

कंटाळून ऍडमिननं एक आयडिया सुचवली, “नो गुड मॉर्निंग, नो गुड नाईट. आणि जे काही लिहायचं असेल ते फक्त काव्यात लिहायचं.”

बरेच दिवस एकही मेसेज दिसला नाही. हळूहळू लोकांना कविता लिहायचा मूड आला.

त्यांच्या थोड्या कविता सादर करतो -

बातमी - बाबा रामदेव यांनी जाहीरपणे कंगना राणौतवर टीका केली. कंगना राणौतने यावर जोरदार पलटवार केला.

वार्ताहर ग्रुपची पोस्ट

कंगनाच्या जवानीवर बोलून बाबा स्वतःच पुरते फसले,

ताई सटकली, त्यांच्या लायकीचे धिंडवडे निघाले,

माझ्या बेडरुमची स्वप्नं बघणं आधी बंद कर तू,

डोळा मारायचा थांबवून आधी स्वतःची लायकी बघ तू!


बातमी - प्रसिद्ध क्रिकेटर आणि बॉलिवूड अभिनेत्री अडकले लग्नबंधनात!

वार्ताहर ग्रुपची पोस्ट

तिने दिला रोमँटिक लूक, त्याने टाकला गुगली बॉल,

लग्नाच्या मंडपातच बांधला त्यांनी, क्रिकेटचा हॉल!

भटजी म्हणाले, 'सावधान, फेरे घ्या आता सात,'

नवरदेव म्हणाला, 'थांबा आधी, थर्ड अंपायरचा काय आहे निर्णय ह्यात?'

📚

ऍडमिन काकांना ह्या कविता काही जमल्या नाहीत. 

कवितेच्या नावाखाली लोक काहीही खरवडायला लागले होते.     

मग त्यांनी अजून एक फर्मान काढलं, ‘मुक्तछंदात कविता नकोत. शास्त्रीय पद्धतीतच बातम्या हव्यात. आणि कवितेच्या खाली छंद/ वृत्तांची नावे द्यावीत. ह्यायोगे काव्याचा अभ्यास होईल.”

एका काकांनी धाडस केलं - 

बातमी - वाढते कांद्याचे भाव 

वार्ताहर ग्रुपची पोस्ट

कांदा कापुनि नेत्र नीर भरले, मागे घडे हे सदा,

आता किंमत पाहताच शिर हे, चक्रावते रे कदा!

ठेवाया सुवर्ण-रौप्य कपाटी, गेले जुने ते दिनी,

चोरू लागले चोर बँक त्यजुनी, कांदे गोदामातुनी!

(शार्दूलविक्रीडित)

त्यानंतर अजून एका काकांची भीड चेपली -  

बातमी - डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल समितीला फोन करून त्यांच्या शांतता पुरस्काराची मागणी केली.

वार्ताहर ग्रुपची पोस्ट

असे ऐकिले ट्रम्प जोडोनि फोन,

"जगामाजि माझ्याहुनी थोर कोण?

मला द्या पुरस्कार नोबेल आज,

असामी असामी असामीच खास!"

(भुजंगप्रयात)

….

हल्लीच कळलंय, सर्व काकांनी कंटाळून एकमताने ऍडमिन बदलला आहे. आणि आता पूर्ववत गुड मॉर्निंग, गुड नाईट सुरु झालंय.

टीप - वरच्या कवितांमधे छंद/ वृत्तांच्या चुका आढळल्यास कळवावे. मी त्या कवींना तसं कळवतो.

माझे कवी मित्र शरद भावे ह्यांना हा किस्सा समर्पित.


Thursday, 8 October 2026

आगळे वेगळे पुणेकर - किस्सा क्र. १२ - गॉगलगाय 🐌

 



काकांना ह्या गोष्टींचा कंटाळा - वॉक, व्यायाम, प्राणायाम वगैरे. तात्त्विक कंटाळा.

“हे सगळं थोतांड आहे.”, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. 

आणि हे पटवून द्यायची त्यांच्याकडे किमान दोन कारणं होती.

१. वॉक, व्यायाम वगैरेमुळं शरीराची झीज होते. अहो, एक किलोमीटर चालल्यानं चक्क ६० कोटी पेशी मरतात. काय फायदा आहे असल्या आत्मघातकी प्रकाराचा?

२. घेरंड संहितेत सांगितलं आहे की ब्रह्मदेवाने आपल्याला आपले श्वास मोजून पृथ्वीवर पाठवलं आहे. म्हणजे भस्त्रिका वगैरे केल्यामुळे आपल्या श्वासांचा अकाउंट लवकर संपेल. हे म्हणजे उद्याचं मरण आज ओढवणं आहे. कोणी सांगितलाय हा उपद्व्याप.

असले जगावेगळे विचार ऐकून लोक काकांच्या वाटेला जात नसत.

काकू त्याच्या अगदी उलट. त्यांचं सकाळचं चालणं अजिबात चुकायचं नाही.

त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यामुळं काकांना सक्तीनं फिरायला घेऊन जायचं ठरवलं. भरपूर खर्च करून काकांसाठी Nike चे कपडे, पायताण, मोजे, टोपी हे सगळं खरेदी केलं. ह्या खर्चापायी काकांना निरुपायानं  बागेत फिरायला जावं लागलं.

एकदा चालता चालता त्यांचं लक्ष बागेच्या पायवाटेवर रेंगाळणाऱ्या गोगलगायीवर गेलं. हळुवार उचलून त्यांनी तिला पायवाटेवरून बाहेर सोडलं. “बाई, हे फेरफटकेवाले तुडवतील ना?”, काकांनी खडसावलं.

चालता चालता त्यांना बऱ्याच गोगलगायी दिसल्या. सगळ्यांना दम देत त्यांनी त्यांना बाहेर काढलं.

🐌

दुसऱ्या दिवशी काका आपणहून वॉकला जायला उठले. काकूंना बरं वाटलं.

काकांना आता गोगलगायींची काळजी होती. 

अशा रीतीने काकांचा नियमित वॉक सुरु झाला.

पण भरभर चालणाऱ्यांना काकांच्या 'वाका आणि गोगलगाय उचला' मोहिमेमुळे अडचण व्हायची. काही काही जण तर मागून हॉर्न वाजवल्यासारखे आवाजही काढायला लागले.

काकांना वाटलं, आपण मधेच थांबून वाकतो ह्याचं कारण लोकांना कळलं पाहिजे.

विचारांती, काकांनी “मी बागेतल्या गोगलगायी वाचवतो” असं टीशर्टच्या पाठीवर गोंदवून घेतलं तेंव्हा लोकांच्या नजरा बदलल्या. “थँक्यू काका.” असं म्हणत लोक त्यांना ओव्हरटेक करू लागले.

काही जण गोगलगायींना स्वतःच उचलून बाजूला ठेऊ लागले.

🐌

एक तरुण डिझायनर कलाकार बरेच दिवस काकांचा हा रोजचा उपक्रम जवळून पाहत होता.

त्याला वाटलं, काकांच्या या अनोख्या मोहिमेचं आपण एक मस्त ब्रँडिंग करावं. आणि त्याला एक भन्नाट शब्द सुचला - 'GoggleGuy'! एका अर्थाने गॉगल घालणारा रुबाबदार असामी, आणि मराठीत 'गोगलगाय'!

त्याने काकांना एक सरप्राईज भेट दिली - 'मी GoggleGuy' असं भडक अक्षरात लिहिलेला एक भारी टी-शर्ट आणि सोबतीला एक स्टायलिश काळा गॉगल! अर्थात अक्षरांशेजारी गोगलगायीचं चित्र.

आवडला का किस्सा?

फिटनेसवाले आमचे मित्र विश्वास जोशी ह्यांना हा किस्सा समर्पित. 

Tuesday, 6 October 2026

आगळे वेगळे पुणेकर - किस्सा क्र. ११ - लीद💩

 


काकांचे एक शास्त्रज्ञ मित्र आहेत डॉ. मोघे. ज्येष्ठ  शास्त्रज्ञ म्हणून ते ओळखले जातात. डॉ. मोघ्यांनी बऱ्याच विषयांवर संशोधन केलंय. त्यातला एक विषय म्हणजे भेसळ. दुधाच्या भेसळीवर तर त्यांनी तब्बल २५ वर्षं संशोधन केलंय.

डॉ. मोघ्यांनी एकदा बोलता बोलता काकांना धण्याच्या पावडरीविषयी सांगितलं. ते म्हणाले, “भेसळ करणारे धण्याच्या पावडरीत घोड्याची लीद (horse droppings) टाकतात.” 

आणि नंतर काकांना २०१२ चा इंडियन एक्सप्रेसचा याविषयीचा एक लेखही पाठवला.

गप्पा झाल्यावर काका घरी आले. डॉक्टरांचं बोलणं मनात घर करून बसलं होतं.

लीद डोक्यातून जात नव्हती.

“मसाले बनवणारे उत्पादक, मसाला विकणारे घाऊक व्यापारी, ह्या सगळ्यांना पाठीशी घालणारे सरकारी विभाग, संत्री-मंत्री … सगळेच पैसेवाले, आपण काय बदलणार ही व्यवस्था.” 

“धणेपूड घरी बनवणं हाच एक उपाय आहे.”, काकांनी ठरवलं.

पण गप्प बसतील तर काका कसले? 

आधी त्यांना त्यांच्या तार्किक बुद्धीनं सांगितलं, “अरे, नक्की काहीतरी औषधी कारण असेल. उगीच कोणी हे करेल का?”

काकांनी अभ्यास केला. औषधी कारणं सोडाच, लीदीमुळे फायदा तर नाहीच. उलट गॅस्ट्रोसारखे रोग होतात असं त्यांना कळलं. 

काकांना वाटलं उत्पादकांना आपण लीदीपेक्षा गोमय (गाईचं शेण) वापरायचा सल्ला देऊ या. पण त्यांनी तो डावलला. त्यासाठी गोमयावर अभ्यास करावा लागणार होता.

💩

मग काकांनी, आपल्याला काय काय करता येईल ह्याचा अभ्यास हाती घेतला.

१. FSSAI FoSCoS portal ला जाऊन तक्रार करणे - पण ते सरकारी पोर्टल असल्याने तक्रार कुठे आणि कशी करावी हे काकांना कळलं नाही. त्यांना शेवटी एक टोल फ्री नंबर दिसला. तिथे फोन करून त्यांनी तक्रार नोंदवली. 

२. तश्याच तक्रारी त्यांनी राज्यस्तरीय विभाग, राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन इत्यादींकडे नोंदवल्या.

मित्रांनी म्हटलं, “अरे आधी पुरावा गोळा करावा लागेल. नुसतं तक्रार करून भागणार नाही. एक काम कर, सरळ कोर्टात जा.”

मग काकांनी कोर्टात कसं जायचं हा अभ्यास सुरु केला. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ या कायद्यातलं कलम ४० वाचलं. 

त्यात लिहिलं होतं - 

"या कायद्यात नमूद केलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे, अन्न सुरक्षा अधिकाऱ्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही अन्नपदार्थाच्या खरेदीदारास, विहित फी भरून अन्न विश्लेषकाकडून अशा पदार्थाचे विश्लेषण करून घेण्यापासून आणि नियमांद्वारे निश्चित केलेल्या कालावधीत अन्न विश्लेषकाकडून त्याच्या विश्लेषणाचा अहवाल प्राप्त करण्यापासून रोखले जाणार नाही:

परंतु अट अशी की, अशा खरेदीदाराने खरेदीच्या वेळी अन्न व्यवसाय चालकाला सदर पदार्थाचे विश्लेषण करून घेण्याच्या आपल्या हेतूविषयी सूचित केले पाहिजे:

परंतु अशीही अट आहे की, जर अन्न विश्लेषकाच्या अहवालावरून असे दिसून आले की तो अन्नपदार्थ हा कायदा किंवा त्याअंतर्गत केलेल्या नियम किंवा नियमावलीचे पालन करत नाही (म्हणजेच तो भेसळयुक्त किंवा असुरक्षित आहे), तर खरेदीदार या कलमांतर्गत त्याने भरलेली फी परत मिळण्यास पात्र असेल."

हे वाचून काका दमले.

काकांना ह्या परिच्छेदांतलं अक्षरही उमगलं नाही. कोर्टाकडे न फिरकण्याविषयी दोन चार अटी मात्र दिसल्या. 

आणि एवढंच कळलं  - “लीदीसाठी कोर्टात खेट्या घालतोय! पात्रंच आहे.”, हे आपल्याला नक्की ऐकावं लागणार आहे.

काकांनी कोर्टात जायचा नाद सोडला.

शेवटी त्यांना एक भन्नाट क्लृप्ती सुचली. 

भीष्मांचा क्षुरप्र बाण भात्यातून काढायचं ठरवलं (ह्या बाणाचं टोक घोड्याच्या खुराला बसवलेल्या नालीच्या आकाराचं असतं म्हणे) 🎯.

एका टांगेवाल्याला गाठलं. टांगा दिवसाच्या भाड्यानं घेतला.

टांगा एका मसाल्याच्या दुकानासमोर उभा ठेऊन त्यापाशी एक पाटी लावली - 

“आम्ही ह्यांना लीद विकत नाही.”

आणि दिवसभर तिथे बसून राहिले.

🐴

मित्रांनो, पुढे काय झालं असेल हे तुम्हीच ओळखा. 

क्षुरप्र बाण नक्की वर्मी लागला का?

एवढं मात्र खरं, काका आनंदले होते.

डॉक्टर प्रमोद मोघे ह्यांना हा किस्सा समर्पित.

टीप: सोबतचं चित्र AI नं बनवलं आहे. काकांच्या मागे दिसणाऱ्या दुकानांच्या पाट्या खरोखरच अस्तित्वात असतील तर तो निव्वळ योगायोग आहे. 

Friday, 2 October 2026

आगळे वेगळे पुणेकर - किस्सा क्र. १० - पुणेकरांचे DNA विश्लेषण🧬🧠

 


डॉक्टर श्रीकांत आणि डॉक्टर विजया जोशी या पुणेरी संशोधक दाम्पत्याची गाडी आता पहिल्या प्रकरणाच्या (MBTI विश्लेषणाच्या) पुढे सरकली होती.

पहिल्या प्रकरणानंतर जोशी दाम्पत्याला एका गोष्टीचा उलगडा झाला होता

-“पुणेकरांचा हा स्वभाव फक्त मानसशास्त्रीय चौकटीत मावणारा नाही. याच्या मुळाशी काहीतरी 'जैविक' (Biological) असलं पाहिजे!”, असं त्यांचं मत होतं. 

त्यामुळे त्यांनी पुढचं प्रकरण हाती घेतलं - "पुणेकरांचे DNA विश्लेषण"

प्रस्तुत संशोधनासाठी त्यांनी डॉ. डेव्हिड वीक्स यांच्या १९९५ मधील संशोधनाचा आधार घेतला. डॉ. वीक्स यांनी १,००० पेक्षा जास्त तऱ्हेवाईक माणसांचा अभ्यास करून १५ लक्षणांची यादी दिली होती. 

पण जोशी दाम्पत्याचं ‘पुणेकरांचं DNA विश्लेषण’ तऱ्हेवाईकपणावर नव्हतं तर ज्याला “पुणेरी बाणा” म्हणतात त्यावर होतं. DNA म्हणजे अनुवंशिक/ जनुकीय घटक (अर्थात खानदानी गुणधर्म, परंपरागत व्हायरस😜)

त्यामुळे त्यांनी पुणेकरांसाठी १५ पैकी ६ लक्षणं  लक्षात घेतली आणि त्यांचं DNA आणि न्यूरो-केमिकल मॅपिंग केलं.

त्या सहा लक्षणांचं विवरण असं - 

१. सामाजिक चौकटी झुगारणे (Non-conforming): OXTR जनुकातील बदलांमुळे सामाजिक संमतीची गरज उरत नाही. उदा. “हेल्मेट घालणे म्हणजे चक्क मूर्खपणा आहे.” (जनुके म्हणजे genes. जनुके DNAचा भाग असतात) 

२. उच्च सर्जनशीलता (Creative): CNTNAP2 आणि न्यूरोप्लास्टिसिटी. उदा. 'पुणेरी पाट्या

३. अ-स्पर्धात्मक वृत्ती (Non-competitive): Dopamine DRD4 ची रचना. उदा. शेजाऱ्याने ऑडी घेतली तरी आपली चेतक स्कूटर श्रेष्ठ मानणे

४. इतरांच्या मतांविषयी अनास्था (Disinterested in others' opinions): Low Serotonin sensitivity (TPH1). उदा. रस्ता विचारल्यावर "आम्ही काय पत्ता सांगायला ह्या जगात अवतरलो आहोत का?" किंवा कोणी चांगला सल्ला (पण न विचारता) दिल्यास, “मी असला सल्ला नेहरूंना दिला होता तिसरीत असताना. ते तिसरीत असताना. मला काय शिकवताय?” वगैरे म्हणणे 

५. खट्याळ विनोदबुद्धी (Mischievous humor): उदा. चेहऱ्यावरची रेष न हलवता  समोरच्याची हवा काढणे

६. आदर्शवाद (Idealistic): Prefrontal Cortex मधील उच्च डोपामाइन. "जगाच्या कल्याणा...' म्हणतात तशी अनंत कामं" पुणेकरांनी केली आहेत. 

एकच उदाहरण देतो - महर्षी कर्वे यांचे सुपुत्र रघुनाथ धोंडो कर्वे (१८८२-१९५३) हे गणिताचे प्राध्यापक होते. त्यांनी आपल्या वडिलांचा समाजसुधारणेचा वारसा पुढे चालवला आणि १९२१ मध्ये भारतातील पहिलं कुटुंब नियोजन केंद्र सुरू केलं. लैंगिक शिक्षण, गर्भनिरोधक साधनं आणि लोकसंख्या नियंत्रण या विषयांवर उघडपणे चर्चा करण्यासाठी त्यांनी जुलै १९२७ ते १९५३ या काळात 'समाज स्वास्थ्य' नावाचं पुरोगामी मराठी मासिक चालवलं. त्यांना लोकांनी कोर्टात खेचलं, पण ते बधले नाहीत.

🧬🧠 

एक महत्वाचा मुद्दा जोशी दाम्पत्यानं आपल्या प्रबंधातून निदर्शनास आणून दिला - “डॉ. वीक्स यांच्या मते तऱ्हेवाईक माणसं इतरांपेक्षा अधिक आनंदी असतात.” त्यामुळे आम्ही म्हणतो - “पुणेकर पुणेरी बाण्याचे आहेत म्हणून आनंदी आहेत!” 

तुम्ही म्हणाल, “नाही, उलटं आहे. ते आनंदी आहेत म्हणून तऱ्हेवाईक आहेत!”

"मी कळवतो जोश्यांना तुमचा विचार. करतील अजून थोडं संशोधन!"

🧬🧠

“अहो हजारो लोकांचे सर्व्हे घेऊन, शेवटी आम्हाला माहीताय तेच सांगताय. ह्या सगळ्या उठाठेवीचा उपयोग काय?”, असं ऐकावं लागू नये म्हणून जोशी दाम्पत्याने या संशोधनाचे ५ मुख्य उपयोग नोंदवले. 

ते असे - 

१. HR व्यवस्थापन: OXTR आणि High Openness मुळे पुणेरी कर्मचाऱ्याला सांघिक खेळाडू बनवण्याऐवजी स्वतंत्र प्रोजेक्ट्स द्यावेत

२. मार्केटिंग धोरणे: Non-competitive वृत्तीमुळे स्टेटस सिम्बॉल दाखवून पुण्यात विक्री होत नाही. उत्पादनात उच्च दर्जा आणि खट्याळ विनोद वापरल्यासच विक्री होते. उदा. “फक्त आलिया भटनं सांगितलं म्हणून आम्ही वज्रदंती वापरत नसतो.” किंवा “शाहरुखनं आपल्या बंगल्यासाठी महागडा रोयाल ऍस्पिरा रंग वापरल्याचं कौतुक काय सांगताय. फालतू लाड नकोत. दर्जा सांगा!” असलं ऐकावं लागतं.

३. नागरी प्रशासन: प्रशासनाने गंभीर आवाहने करण्याऐवजी Mischievous Humor चा वापर करून 'पुणेरी पाट्यांच्या' स्वरूपातच फलक लावावेत.

४. सांस्कृतिक पर्यटन: पर्यटकांना ‘अमुचा पुणेरी बाणा’ ही मार्गदर्शिका द्यावी.

५. टेलिमार्केटिंग प्रशिक्षण: उपरोधाला न डगमगता उत्तर  देण्याची कला कॉल-सेंटर्सना शिकवावी लागेल. 

हे एक उदाहरण - 

एका बँकेच्या टेलिमार्केटिंगवाल्याने एका काकांना “कर्ज हवं का?” असं विचारलं. 

“होय.”, काका म्हणाले. 

“किती हवंय?” 

काका, “२०० कोटी”. 

“काय? २०० कोटी?”

काका, “त्याचं असं आहे, मला बुलेट ट्रेन घ्यायची आहे. साधारण २२० कोटी  खर्च आहे. आठ डब्यांची घ्यायची म्हणतो. तिला काही इंजिन वगैरे नसतं म्हणे. कारण प्रचंड वेगाने पुढे ढकलणारी यंत्रणा आणि उच्च-क्षमतेचे ट्रॅक्शन मोटर्स प्रत्येक डब्याच्या खालच्या भागात बसवलेले असतात. असो. पण त्यामुळे इंजिनाचा खर्च वाचला आहे. तुम्ही २०० कोटीची तरतूद करा. वरचे २० कोटी जमल्येत माझ्याकडे.”

हे ऐकून टेलीकॉलरने रागाने फोन ठेवून द्यावा की हे म्हणावं -  

“काका, २० कोटी जमवलेत म्हणजे तुम्ही निम्मे पास झालायत्! कर्जाची प्रोसेसिंग फी आणि जीएसटी वगैरे धरून २ कोटी रुपये होतील. त्याचा चेक घ्यायला माणूस पाठवतो. किती वाजता पाठवू?”  “तुमच्याशी बोलून फार बरं वाटलं. बुलेट ट्रेनला इंजिन नसतं हे मला अजिबात माहीत नव्हतं. तुमच्यामुळं कळलं." 

अशा उत्तरामुळे हे फायदे होतात - 

१. सकारात्मक शेवटामुळे ग्राहक खुश होतात (ह्याला peak-end rule असं म्हणतात)

२. ग्राहकांकडून शिकण्याची वृत्ती दिसते

३. कंपनीची प्रतिमा उजळते. 

(हे जरा जास्तच बरळणं झालं. पण काकांचा हा किस्सा खरा घडलेला आहे. त्यामुळे संशोधनाच्या नावाखाली थोडं अधिक लिहिण्याचा अधिकार आम्ही घेतला आहे.)

तर तात्पर्य काय? पुणेकरांची जनुके हटके आहेत.

🧬🧠

टीप (फक्त अभ्यासू वाचकांसाठी): 

तुम्ही वर OXTR, CNTNAP2, DRD4, TPH1 असे शब्द वाचले असतील. ही खरोखरची जनुके (genes) आहेत. पण त्यांचा पुणेरी बाण्याशी असलेला संबंध आणि ‘DNA विश्लेषण’ मात्र पूर्णपणे काल्पनिक आहे. 

या जनुकांची थोडक्यात माहिती:

OXTR: हे जनुक Oxytocin receptor तयार करण्याशी संबंधित आहे. सामाजिक बंध, विश्वास आणि इतरांशी सामाजिक वर्तन यांच्याशी त्याचा संबंध असल्याचे संशोधन झाले आहे.

CNTNAP2: हे जनुक मेंदूतील न्यूरॉन्सच्या कार्याशी आणि मेंदूच्या विकासाशी संबंधित आहे. भाषा आणि संवादाशी त्याचे संबंधही संशोधनात आढळले आहेत.

DRD4: हे जनुक Dopamine receptor शी संबंधित आहे. नवीन अनुभवांची ओढ (Novelty-seeking) आणि काही वर्तनात्मक वैशिष्ट्यांशी त्याचे संबंध अभ्यासले गेले आहेत.

TPH1: हे जनुक शरीरात Serotonin तयार होण्याच्या प्रक्रियेत भूमिका बजावते. Serotonin शी संबंधित विविध शारीरिक आणि मानसिक प्रक्रियांमध्ये त्याचा अप्रत्यक्ष संबंध आहे.

म्हणून पुन्हा एकदा स्पष्ट करतो - वरील जनुके खरी आहेत; पण त्यावर आधारित ‘पुणेकरांचे DNA विश्लेषण’ हे आमच्या जोशी दाम्पत्याच्या कल्पनेतून जन्मलेलं आहे!


Tuesday, 29 September 2026

आगळे वेगळे पुणेकर - किस्सा क्र. ९ - धोंडूच्या माई📱


 

ह्या आहेत सुनीता काकू. घरातल्या बारीक-सारीक गोष्टींवरून शेजारपाजारच्या काकूंकडे  सुनेची, म्हणजेच सायलीची, गाऱ्हाणी गाणे हा त्यांचा आवडता छंद. घरात मिठाचा दाणा कमी झाला, तरी त्याची बातमी गल्लीत पोहोचायची.

न राहून सायलीने शेवटी आपले भ्रतार, सुयश ह्यांना म्हटलं, “अब्रू वेशीवर टांगतायत तुमच्या आई. जरा सांग ना त्यांना.”

सुयशने एक शक्कल लढवली. काकूंच्या फोनमध्ये 'एआय' (AI) टाकलं आणि आईला म्हणाला, “आई, एक गंमत सांगतो, ऐक. तुझ्या मोबाईलमध्ये आता एक हुशार वल्ली आहे, धोंडू नावाची. धोंडूशी कसं बोलायचं ते मी तुला शिकवीन. तुला जे काही बोलायचं असेल, ते त्याच्याशी बिंधास्त बोल.”

📱

हळूहळू काकूंची भीड मोडली. त्या धोंडूशी व्यवस्थित बोलायला लागल्या. 

एक दिवस चहातली साखर कमी पडली, तर धोंडू म्हणाला "प्रेमाने सांगा किंवा सकारात्मक विचार करा." दुसऱ्या दिवशी कारल्याच्या भाजीवरून तक्रार केली, तर धोंडूने "मधुमेहासाठी चांगलं असतं" म्हणत उलट सायलीचीच बाजू घेतली. 

एकदा सायली-सुयश शॉपिंगला निघाले. काकूंनी आपली नाराजी धोंडूला कळवली, "पती-पत्नीने एकत्र वेळ घालवणे चांगलंच." असा सल्ला मिळाला. काकूंचा प्रत्येक वेळी हिरमोड व्हायचा.

"हा धोंडू बहुतेक सायलीच्या माहेरचा दिसतोय!" "फक्त माझी खरडपट्टी काढायला जन्माला आलाय."

📱 

हळूहळू रोज शेजाऱ्यांकडे जाऊन गाऱ्हाणी सांगण्याऐवजी, काकू आता धोंडूशी गप्पा मारू लागल्या, त्याची उत्तरं ऐकू लागल्या, कधीमधी “तू चुकीचं सांगतोयस.”  अशी त्याची खबरही घेऊ लागल्या.

एकदा काकू आपला फोन घरातच विसरून मंदिरात गेल्या होत्या. नेमकं नोटिफिकेशन वाजलं आणि सायलीने फोन उचलला. सायलीला मोबाईलवर धोंडूची स्क्रीन दिसली. तिने उत्सुकतेनं स्क्रोल केलं आणि तिला धक्काच बसला. तिच्याबद्दलच्या शेकडो तक्रारी काकूंनी नोंदवल्या होत्या.

पण जेव्हा तिने धोंडूची उत्तरं पाहिली, तेव्हा तिला जाणवलं की हल्ली तिच्या सासूबाई बाहेर कुठेही घरातली तक्रार न सांगता, मोबाईलवर मन मोकळं करतायत आणि नकळत स्वतःमध्ये बदल घडवून आणतायत.

“हे सुयशचं काम दिसतंय.” असं पुटपुटत तिने काकूंचा फोन ठेवून दिला.

📱

थोड्याच दिवसात एक मस्त पायंडा पडला. 

सासू-सुनेला एकमेकींबद्दल काहीही तक्रार करायची असेल, तर थेट वाद न घालता ती 'धोंडू' समोरच फिर्याद मांडायची. आता दर रविवारी चहाच्या टेबलवर हे तिघं आणि मधे 'धोंडू' असा दरबार भरू लागला.

विशेषतः काकूंच्या नातवाच्या, चिन्मयच्या संगोपनाचा विषय निघाला की धोंडूची खरी परीक्षा असायची. 

एका रविवारी काकूंनी पहिली तोफ डागली, "अरे धोंडू, सायलीचं सकाळचं वागणं बघून माझं डोकं उठतं बघ! ती चिन्मयला 'आज खायला काय देऊ? काय बनवू तुझ्यासाठी?' अशा रोजच्या प्रश्नांनी भंडावून सोडते बाळाला. आता तूच सांग एवढ्याशा जिवाला काय कळणारे?"

धोंडूनं लगेच उत्तर दिलं, "खरं आहे तुमचं म्हणणं काकू. पण, चिन्मयच्या वयाच्या योग्य आहाराबद्दल त्याच्या डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे. पण रोज ‘काय खाणार?’ असं विचारण्याऐवजी घरात जे पौष्टिक जेवण बनतं, त्यातून दोन-तीन पर्याय देऊन त्याला निवडू देणं हा एक मार्ग आहे. प्रश्न मिटला!" 

काकू थांबणार होत्या थोडच! त्यांनी लगेच पुढची तोफ डागली..., "अरे चिन्मयसाठी ही दोघं एवढी महागडी खेळणी आणतात, काही विचारू नकोस! घर म्हणजे खेळण्यांचं दुकान झालंय."

यावर धोंडूनं सुवर्णमध्य काढत उत्तर दिलं, "काकू, मुलांचा क्रिएटिव्ह विकास फार महत्त्वाचा असतो. खेळणी त्यांच्या आयुष्याचा मोठा भाग आहे. असं का करत नाही? तुम्ही तिघे एकत्र बसून चिन्मयसाठी घरातल्या जुन्या टाकाऊ वस्तूंपासून घरीच खेळणी का बनवत नाही? चिन्मयलासुद्धा यातून खूप काही नवीन शिकायला मिळेल आणि कुटुंबाचा वेळही छान जाईल." कल्पना सगळ्यांना आवडली. अंमलात आणली गेली.

एकदा काकू म्हणाल्या, "अरे धोंड्या, सांग बरं या सायलीला. आजकालच्या आया, मुलांना सारखं ते ओट्स नि ब्रोकोली खायला घालतात. आम्ही सुयशला तूप-पोळी आणि डिंकाचे लाडू देऊन वाढवलंय. काय धाड भरल्येय त्याला?”

धोंडूने लगेच दोन्ही बाजू सांभाळत समजूतदारपणा दाखवला, "काकू, सायली आरोग्यासाठी ब्रोकोली देत असेल तर काय वाईट आहे? तुम्ही दोघी मिळून चिन्मयला 'तूप-पोळी विथ ब्रोकोली सूप' असा कॉम्बो का देत नाही?"

“पण आजकाल मुलांना मीठ साखर देत नाहीत ना!”, काकू पुटपुटल्या. 

धोंडूनं दटावलं, “काकू, मूल त्यांचं आहे. मुलगा आणि सून मॅच्युअर आहेत. का नाक खुपसता?“  

कधी सायलीही सासूची कंप्लेंट करायची, “चिन्मयला मोबाईल  देऊ नका असं हजारदा सांगूनही सासूबाई ऐकत नाहीत.” धोंडू, “काकू, त्यापेक्षा तुम्ही त्याला गोष्टी का सांगत नाही?” काकू, “हो बाबा. सांगते.”

रविवारच्या दरबारात आता फक्त कागाळ्या नव्हत्या. पैसे कसे इन्व्हेस्ट करायचे, मृत्युपत्र कधी करायचं, प्रवास कधी आणि कुठे करायचा, पुढच्या आठवड्याचा मेन्यू काय अशा अनेक विषयांवर धोंडूचं मत घेतलं जाऊ लागलं.  

आणि अशा प्रकारे धोंडू त्यांचा फॅमिली मेंबर झाला.

📱 

एका दुपारी गल्लीतल्या दोन काकू सुनीताकाकूंच्या घरी आल्या. म्हणाल्या, "काय गं सुनीता, तू हल्ली गप्पा मारायला अजिबात भेटत नाहीयेस?"

सुनीताकाकू चहाचा कप ट्रे टेबलावर ठेवत हसल्या. म्हणाल्या, "हो ना! तुम्हाला हेच म्हणायचंय ना की मी हल्ली सुनेच्या कागाळ्या सांगायला का येत नाही? अहो, मला एक उत्तम युक्ती सापडली आहे." 

काकूंनी लगेच आपला फोन त्यांना दाखवला आणि धोंडूची ओळख करून दिली. म्हणाल्या, “आता घरातल्या सगळ्या कम्प्लेंटस् मी धोंडूला सांगते आणि तो त्यावर तोडगा काढतो. तुम्हालाही हे शिकवायला मला आवडेल." 

सद्यस्थिती अशी आहे - गल्लीतल्या सगळ्या सासूबाई दुपारी एकत्र जमून सुनीता काकूंकडून एआय वापरायचं ट्रेनिंग घेत असतात. 

प्रत्येकीने फोनमध्ये आपापला 'धोंडू' पाळलाय. आणि गल्लीतल्या सर्व बायकांनी मिळून सुनीता काकूंचं एक नवीन नामकरण केले आहे, ‘धोंडूच्या माई'!

काय, कधी येताय सुनीता काकूंकडे? तुमच्या धोंडूला भेटायला?

📱


About Me

My photo
Bangalore, Karnataka, India
My purpose is to manufacture success and happiness