डॉक्टर श्रीकांत आणि डॉक्टर विजया जोशी या पुणेरी संशोधक दाम्पत्याची गाडी आता पहिल्या प्रकरणाच्या (MBTI विश्लेषणाच्या) पुढे सरकली होती.
पहिल्या प्रकरणानंतर जोशी दाम्पत्याला एका गोष्टीचा उलगडा झाला होता
-“पुणेकरांचा हा स्वभाव फक्त मानसशास्त्रीय चौकटीत मावणारा नाही. याच्या मुळाशी काहीतरी 'जैविक' (Biological) असलं पाहिजे!”, असं त्यांचं मत होतं.
त्यामुळे त्यांनी पुढचं प्रकरण हाती घेतलं - "पुणेकरांचे DNA विश्लेषण"
प्रस्तुत संशोधनासाठी त्यांनी डॉ. डेव्हिड वीक्स यांच्या १९९५ मधील संशोधनाचा आधार घेतला. डॉ. वीक्स यांनी १,००० पेक्षा जास्त तऱ्हेवाईक माणसांचा अभ्यास करून १५ लक्षणांची यादी दिली होती.
पण जोशी दाम्पत्याचं ‘पुणेकरांचं DNA विश्लेषण’ तऱ्हेवाईकपणावर नव्हतं तर ज्याला “पुणेरी बाणा” म्हणतात त्यावर होतं. DNA म्हणजे अनुवंशिक/ जनुकीय घटक (अर्थात खानदानी गुणधर्म, परंपरागत व्हायरस😜)
त्यामुळे त्यांनी पुणेकरांसाठी १५ पैकी ६ लक्षणं लक्षात घेतली आणि त्यांचं DNA आणि न्यूरो-केमिकल मॅपिंग केलं.
त्या सहा लक्षणांचं विवरण असं -
१. सामाजिक चौकटी झुगारणे (Non-conforming): OXTR जनुकातील बदलांमुळे सामाजिक संमतीची गरज उरत नाही. उदा. “हेल्मेट घालणे म्हणजे चक्क मूर्खपणा आहे.” (जनुके म्हणजे genes. जनुके DNAचा भाग असतात)
२. उच्च सर्जनशीलता (Creative): CNTNAP2 आणि न्यूरोप्लास्टिसिटी. उदा. 'पुणेरी पाट्या
३. अ-स्पर्धात्मक वृत्ती (Non-competitive): Dopamine DRD4 ची रचना. उदा. शेजाऱ्याने ऑडी घेतली तरी आपली चेतक स्कूटर श्रेष्ठ मानणे
४. इतरांच्या मतांविषयी अनास्था (Disinterested in others' opinions): Low Serotonin sensitivity (TPH1). उदा. रस्ता विचारल्यावर "आम्ही काय पत्ता सांगायला ह्या जगात अवतरलो आहोत का?" किंवा कोणी चांगला सल्ला (पण न विचारता) दिल्यास, “मी असला सल्ला नेहरूंना दिला होता तिसरीत असताना. ते तिसरीत असताना. मला काय शिकवताय?” वगैरे म्हणणे
५. खट्याळ विनोदबुद्धी (Mischievous humor): उदा. चेहऱ्यावरची रेष न हलवता समोरच्याची हवा काढणे
६. आदर्शवाद (Idealistic): Prefrontal Cortex मधील उच्च डोपामाइन. "जगाच्या कल्याणा...' म्हणतात तशी अनंत कामं" पुणेकरांनी केली आहेत.
एकच उदाहरण देतो - महर्षी कर्वे यांचे सुपुत्र रघुनाथ धोंडो कर्वे (१८८२-१९५३) हे गणिताचे प्राध्यापक होते. त्यांनी आपल्या वडिलांचा समाजसुधारणेचा वारसा पुढे चालवला आणि १९२१ मध्ये भारतातील पहिलं कुटुंब नियोजन केंद्र सुरू केलं. लैंगिक शिक्षण, गर्भनिरोधक साधनं आणि लोकसंख्या नियंत्रण या विषयांवर उघडपणे चर्चा करण्यासाठी त्यांनी जुलै १९२७ ते १९५३ या काळात 'समाज स्वास्थ्य' नावाचं पुरोगामी मराठी मासिक चालवलं. त्यांना लोकांनी कोर्टात खेचलं, पण ते बधले नाहीत.
🧬🧠
एक महत्वाचा मुद्दा जोशी दाम्पत्यानं आपल्या प्रबंधातून निदर्शनास आणून दिला - “डॉ. वीक्स यांच्या मते तऱ्हेवाईक माणसं इतरांपेक्षा अधिक आनंदी असतात.” त्यामुळे आम्ही म्हणतो - “पुणेकर पुणेरी बाण्याचे आहेत म्हणून आनंदी आहेत!”
तुम्ही म्हणाल, “नाही, उलटं आहे. ते आनंदी आहेत म्हणून तऱ्हेवाईक आहेत!”
"मी कळवतो जोश्यांना तुमचा विचार. करतील अजून थोडं संशोधन!"
🧬🧠
“अहो हजारो लोकांचे सर्व्हे घेऊन, शेवटी आम्हाला माहीताय तेच सांगताय. ह्या सगळ्या उठाठेवीचा उपयोग काय?”, असं ऐकावं लागू नये म्हणून जोशी दाम्पत्याने या संशोधनाचे ५ मुख्य उपयोग नोंदवले.
ते असे -
१. HR व्यवस्थापन: OXTR आणि High Openness मुळे पुणेरी कर्मचाऱ्याला सांघिक खेळाडू बनवण्याऐवजी स्वतंत्र प्रोजेक्ट्स द्यावेत
२. मार्केटिंग धोरणे: Non-competitive वृत्तीमुळे स्टेटस सिम्बॉल दाखवून पुण्यात विक्री होत नाही. उत्पादनात उच्च दर्जा आणि खट्याळ विनोद वापरल्यासच विक्री होते. उदा. “फक्त आलिया भटनं सांगितलं म्हणून आम्ही वज्रदंती वापरत नसतो.” किंवा “शाहरुखनं आपल्या बंगल्यासाठी महागडा रोयाल ऍस्पिरा रंग वापरल्याचं कौतुक काय सांगताय. फालतू लाड नकोत. दर्जा सांगा!” असलं ऐकावं लागतं.
३. नागरी प्रशासन: प्रशासनाने गंभीर आवाहने करण्याऐवजी Mischievous Humor चा वापर करून 'पुणेरी पाट्यांच्या' स्वरूपातच फलक लावावेत.
४. सांस्कृतिक पर्यटन: पर्यटकांना ‘अमुचा पुणेरी बाणा’ ही मार्गदर्शिका द्यावी.
५. टेलिमार्केटिंग प्रशिक्षण: उपरोधाला न डगमगता उत्तर देण्याची कला कॉल-सेंटर्सना शिकवावी लागेल.
हे एक उदाहरण -
एका बँकेच्या टेलिमार्केटिंगवाल्याने एका काकांना “कर्ज हवं का?” असं विचारलं.
“होय.”, काका म्हणाले.
“किती हवंय?”
काका, “२०० कोटी”.
“काय? २०० कोटी?”
काका, “त्याचं असं आहे, मला बुलेट ट्रेन घ्यायची आहे. साधारण २२० कोटी खर्च आहे. आठ डब्यांची घ्यायची म्हणतो. तिला काही इंजिन वगैरे नसतं म्हणे. कारण प्रचंड वेगाने पुढे ढकलणारी यंत्रणा आणि उच्च-क्षमतेचे ट्रॅक्शन मोटर्स प्रत्येक डब्याच्या खालच्या भागात बसवलेले असतात. असो. पण त्यामुळे इंजिनाचा खर्च वाचला आहे. तुम्ही २०० कोटीची तरतूद करा. वरचे २० कोटी जमल्येत माझ्याकडे.”
हे ऐकून टेलीकॉलरने रागाने फोन ठेवून द्यावा की हे म्हणावं -
“काका, २० कोटी जमवलेत म्हणजे तुम्ही निम्मे पास झालायत्! कर्जाची प्रोसेसिंग फी आणि जीएसटी वगैरे धरून २ कोटी रुपये होतील. त्याचा चेक घ्यायला माणूस पाठवतो. किती वाजता पाठवू?” “तुमच्याशी बोलून फार बरं वाटलं. बुलेट ट्रेनला इंजिन नसतं हे मला अजिबात माहीत नव्हतं. तुमच्यामुळं कळलं."
अशा उत्तरामुळे हे फायदे होतात -
१. सकारात्मक शेवटामुळे ग्राहक खुश होतात (ह्याला peak-end rule असं म्हणतात)
२. ग्राहकांकडून शिकण्याची वृत्ती दिसते
३. कंपनीची प्रतिमा उजळते.
(हे जरा जास्तच बरळणं झालं. पण काकांचा हा किस्सा खरा घडलेला आहे. त्यामुळे संशोधनाच्या नावाखाली थोडं अधिक लिहिण्याचा अधिकार आम्ही घेतला आहे.)
तर तात्पर्य काय? पुणेकरांची जनुके हटके आहेत.
🧬🧠
टीप (फक्त अभ्यासू वाचकांसाठी):
तुम्ही वर OXTR, CNTNAP2, DRD4, TPH1 असे शब्द वाचले असतील. ही खरोखरची जनुके (genes) आहेत. पण त्यांचा पुणेरी बाण्याशी असलेला संबंध आणि ‘DNA विश्लेषण’ मात्र पूर्णपणे काल्पनिक आहे.
या जनुकांची थोडक्यात माहिती:
OXTR: हे जनुक Oxytocin receptor तयार करण्याशी संबंधित आहे. सामाजिक बंध, विश्वास आणि इतरांशी सामाजिक वर्तन यांच्याशी त्याचा संबंध असल्याचे संशोधन झाले आहे.
CNTNAP2: हे जनुक मेंदूतील न्यूरॉन्सच्या कार्याशी आणि मेंदूच्या विकासाशी संबंधित आहे. भाषा आणि संवादाशी त्याचे संबंधही संशोधनात आढळले आहेत.
DRD4: हे जनुक Dopamine receptor शी संबंधित आहे. नवीन अनुभवांची ओढ (Novelty-seeking) आणि काही वर्तनात्मक वैशिष्ट्यांशी त्याचे संबंध अभ्यासले गेले आहेत.
TPH1: हे जनुक शरीरात Serotonin तयार होण्याच्या प्रक्रियेत भूमिका बजावते. Serotonin शी संबंधित विविध शारीरिक आणि मानसिक प्रक्रियांमध्ये त्याचा अप्रत्यक्ष संबंध आहे.
म्हणून पुन्हा एकदा स्पष्ट करतो - वरील जनुके खरी आहेत; पण त्यावर आधारित ‘पुणेकरांचे DNA विश्लेषण’ हे आमच्या जोशी दाम्पत्याच्या कल्पनेतून जन्मलेलं आहे!


No comments:
Post a Comment