घोरपडी रेल्वे गेटजवळ संध्याकाळच्या पाच वाजता वाहनांचा जो काही 'महापूर' यायचा, त्याला तोड नाही.
एकीकडे रेल्वे गेटची ती कानठळ्या बसवणारी ‘टींग-टींग-टींग-टींग’ तर दुसरीकडे हजारो दुचाकींच्या सायलेन्सरमधून निघणारा काळा धूर... या सगळ्या नरकयातनांच्या मधोमध उभा होता एक सिमेंटचा अवाढव्य सांगाडा! घोरपडीचा उड्डाणपूल (Flyover).
जवळच एका कट्ट्यावर दररोज संध्याकाळी एक 'सिनियर सिटीझन गँग' जमायची.
"अहो कुलकर्णी, ऐकलंत का? अमिताभ बच्चनने म्हणे मुंबईत ५० कोटींचा नवीन फ्लॅट घेतलाय!" वसंतरावांनी नेहमीप्रमाणे गप्पांचा श्रीगणेशा केला.
"असेल बाबा! इथे आपल्या घोरपडीच्या उड्डाणपुलाला दहा वर्ष झाली तरी एक स्लॅब टाकायला पालिकेकडे पैसे नाहीयेत. ५० कोटीत तर अख्ख्या घोरपडीचा कायापालट झाला असता," देशपांडे.
"पैशांचा प्रश्न नाहीये हो देशपांडे," अभ्यंकरांनी गुपित फोडलं. "माझी ठेकेदाराशी (Contractor) बोलणी झालीयेत. पालिकेच्या फाईली मंजूर आहेत, पण त्या टेबलवरून पुढे सरकवण्यासाठी खालून 'पाकीट' द्यावं लागतंय. ठेकेदार बिचारा आधीच बँकेच्या व्याजाने मेलाय, तो लाच कुठून देणार?”
जोशी, “पुराव्याशिवाय बोलू नका अभ्यंकर. लाच बीच काही नाहीये. मिलिटरीची जमीन, रेल्वेची परवानगी आणि पालिकेचा अधिकार असा त्रिशंकू गोंधळ आहे.”
"पण आपण फक्त कट्ट्यावर बसून चर्चाच करणार का? काहीतरी आंदोलन करूया,"
"घोषणाबाजी करायला आपण तरुण नाही आहोत वसंतराव.”
कुलकर्णींच्या डोक्यात एक आयडिया चमकून गेली.
ते उठून उभे राहिले, समोरच्या अर्धवट पुलाकडे पाहिलं आणि म्हणाले, "आपण या पुलावर शेती करायची!"
"शेती? पुलावर? आणि तेही सिमेंटवर?" देशपांडे उडालेच.
"हो! आपण तिथे 'पालक' लावायचा, 'पा-ल-क'!" कुलकर्णी मिश्कीलपणे हसले. "शासनाने या पुलाला 'अनाथ' सोडलंय... आपण 'पालक' बनूया, म्हणजे उगवूया!"
कट्ट्यावर एकच हशा पिकला. आयडिया भन्नाट होती, तिला पुणेरीपणा होता.
लगेच प्रश्न विचारायला सुरुवात झाली. “ह्याने काय होणार आहे?”, “परवानगी कशी आणि कुठे घ्यायची?”,
“पालक उगवायच्या आधीच पुलाचं काम सुरु झालं तर सगळी मेहनत पाण्यात.”
बऱ्याच चर्चेनंतर मृतवत उड्डाणपुलाच्या शरीरावर शेती करायचं ठरलं.
प्लॅन बनला. सगळी 'लॉजिस्टिक' तयार झाली.
आणि एके दिवशी पहाटे ५ वाजता, ७० पारच्या मावळ्यांनी पुलावर चढाई केली.
प्लास्टिकचे रिकामे क्रेट्स, सेंद्रिय खताची पोती आणि पालकाच्या बिया, खुरपी .... वगैरे घेऊन.
🥬
हळूहळू कोंब दिसायला लागले. झाऱ्या उचलून पालकांना पाणी घालण्याच्या व्यायामाने सगळ्या काकांच्या तब्येती सुधारल्या.
एका काकांनी पालकचोऱ्या (पाल कचोऱ्या नव्हे, पालक-चोऱ्या) रोखण्यासाठी पुलावर एका जुन्या खेळण्यातला लाल लाईट लावून 'डुप्लिकेट सीसीटीव्ही' बसवला.
खाली अस्सल पुणेरी पाटी लावली:
"सीसीटीव्ही कॅमेरा चालू आहे! 🎥
पण पालक मोफत आहे बरं.
फक्त भाजी काढतानाचा एक व्हिडिओ बनवा.
सोशल मीडियावर टाका
आणि आमच्या या अनाथ पुलाबद्दल बोला!
#रस्त्यावरचेपालक"
हा हुकमी एक्का कमालीचा यशस्वी ठरला.
काही टवाळ पोरांनी सुरुवात केली - "गाईज, हे बघा आपल्या पुण्यातले भारी आजोबा!" हा त्यांचा व्हिडिओ वायरल झाला. मग काय? पाहाता पाहाता #रस्त्यावरचेपालक हा हॅशटॅग धुमाकूळ घालायला लागला.
काही लोकांनी काका कंपूची सोशल मीडियावर भरपूर मस्करी केली.
काकांनी टोमण्यांकडं दुर्लक्ष केलं. त्यांना आता सूर सापडला होता.
एका पोरानं तर कमाल केली. सोशल मीडियावर चक्क पोवाडा टाकला.
ऐका हो ऐका जनहो, पुणेकरांची गाथा,
घोरपडीच्या उभ्या पुलावर, पालक पेर्ला माथा!
पाआलिकेची झोप उडाली, जागी झाली सत्ता,
काकांच्या या खुरप्यानं हो, हालवला बत्ता!
मी फक्त चार ओळी देतोय, पूर्ण पोवाडा पाहायला इन्स्टाला जा.
🥬
बघता बघता पुलाचा सांगाडा मखमली हिरव्या नंदनवनात बदलून गेला.
पालिकेने दाखल घेतली. म्हणजेच, अतिक्रमण विरोधी पथक आणि पोलीस गाड्या पुलावर कारवाई करायला आल्या.
लोकांना ह्याची कुणकुण आधीच लागली होती. पुलाजवळ गर्दी जमायला लागली.
काकांनी पोलिसांना पालकाच्या जुड्या दिल्या आणि कळवलं, “लवकर काम सुरु करा. पालकाच्या कापणीनंतर मेथी लावायचा बेत आहे.”
जनतेने एकच जल्लोष केला.
ह्या दबावापुढे प्रशासनाला झुकावं लागलं. निधी मंजूर झाला, काम वेगानं सुरू झालं आणि अखेर तो भव्य घोरपडी उड्डाणपूल पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला झाला.
पुलाच्या उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आजोबांची गँग नेहमीच्या कट्ट्यावर बसली होती.
वसंतरावांनी पुलाकडं पाहिलं आणि थोडे खिन्न होऊन म्हणाले, "पुलाचं काम तर झालं मित्रांनो. पण आपला मळा गेला.”
“होतं असं आयुष्यात वसंतराव. उगी. तुम्ही अगदी, 'गड आला पण सिंह गेला' ह्याटाईप बोलताय.”, अभ्यंकर.
तरी पण सगळे जरा उदास होते. ओकं ओकं वाटत होतं.
कुलकर्ण्यांनी हळूच आपल्या झोळीतून एक नवीन लाकडी फळी काढली.
त्यावर पांढऱ्या रंगानं छान अक्षरात लिहिलेलं होतं.
“येथे फिरकू नये. पालक पेरायचे काम लवकरच सुरु होत आहे.”
देशपांड्यांनी चष्मा नीट करत वाचलं, "हे काय आहे?"
“अहो, मी ऐकलंय की युनिव्हर्सिटी चौकातला तो डबल डेकर पूल अजून रखडलाय.... उद्या सकाळी तिथे लावायला आणलाय."🌳


No comments:
Post a Comment