Wednesday, 23 September 2026

आगळे वेगळे पुणेकर - किस्सा क्र. ७ - काकांचं कर्णकुंडलिनी तंत्र 👂

 


काका नुकतेच संध्याकाळी बागेत फिरून आले होते. तिथे बाकावर बसलेल्या दोन तरुण मुलांचं बोलणं त्यांच्या कानावर पडलं होतं, “अरे ही म्हातारी माणसं ना, एकदा बोलायला लागली की थांबतच नाहीत." 

काका काहीच बोलले नाहीत, पण घरी येऊन बराच वेळ शांत बसून राहिले.

रात्री जेवताना बायकोला म्हणाले, "मी फार बोलतो का गं?"

"तुम्ही विचारताय, म्हणजे उत्तर तुम्हाला आधीच माहीत आहे." 

म्हणजेच - “हो”

त्या रात्रीपासून काकांनी ठरवलं - आपण नुसतं कमी बोलायचं नाही, तर उत्तम पद्धतीने ऐकायला शिकायचं. आणि काकांचा स्वभाव असा - नुसतं शिकायचं नाही, त्याचं एक शास्त्र बनवायाचं.

आधी लोक दुसऱ्याचं  बोलणं ऐकतांना काय काय करतात हे त्यांनी वाचलं. उदा. घाईघाईने सल्ला देणे, समोरच्याचे वाक्य पूर्ण करणे, फोनकडे पाहाणे" वगैरे. 

मग शोधाशोध करता करता त्यांच्या हाती कार्ल रॉजर्स आणि रिचर्ड फार्सन यांचं १९५७ सालचं "Active Listening" (सक्रिय श्रवण) हे पुस्तक लागलं. तिथून पुढे  जेरार्ड एगनचं SOLER मॉडेल, Julian Treasure's ची  RASA पद्धत, रिचर्ड पॉल यांची प्रश्नपद्धती वगैरे वगैरे संपवलं. आणि मग ठरवलं - या सगळ्याचं एकत्रीकरण करून आपली स्वतःची पद्धत बनवायची. 

नाव ठरलं — "कर्णकुंडलिनी तंत्र".

शिकायच्या आणि वापरायच्या पायऱ्या ठरल्या. चक्क कराटेसारख्या पाच पायऱ्या करायचं ठरलं.

ह्या काकांच्या कर्णकुंडलिनी तंत्राच्या पायऱ्या - 

पहिली पायरी — श्वेत पट्टा (White Belt): "मौन धारण"

संदर्भ - "Active Listening" (सक्रिय श्रवण) - कार्ल रॉजर्स (Carl Rogers) आणि रिचर्ड फार्सन (Richard Farson)

अभ्यासातून काय वेचावं - "सक्रिय श्रवण म्हणजे आधी न बोलता 'उपस्थित' राहणे."

ह्या पायरीसाठी काकांना आठवलेलं महाभारतातील उदाहरण - संजय अठरा दिवस युद्धाचं वर्णन धृतराष्ट्राला ऐकवत होता, आणि धृतराष्ट्र, कितीही वेदनादायक बातमी असली तरी, न थांबता ऐकत राहिला. 

टीप - "उपस्थित राहणं किती अवघड असतं ते धृतराष्ट्रालाच विचारा."

सराव - गणेश मंडळाच्या बैठका (पूर्ण तासभर एकही शब्द न बोलणे). 

लोकांची प्रतिक्रिया - काकांचं मौन बघून शेवटी अध्यक्षांनी विचारलं, "काका, काही म्हणायचंय का?" काका शांतपणे म्हणाले, "नाही, मी फक्त प्रॅक्टिस करतोय." सगळे एकमेकांकडे बघत राहिले.

ही पायरी गाठल्याचं लक्षण - सोसायटीत आधी "तापट काका" म्हणून ओळखले जाणारे काका आता "शांत काका" म्हणून ओळखले जाऊ लागले.

दुसरी पायरी — पिवळा पट्टा (Yellow Belt): "हुंकार शास्त्र"

संदर्भ - जेरार्ड एगनचं SOLER मॉडेल (सोलेर प्रारूप)

अभ्यासातून काय वेचावं - देहबोली आणि लक्ष आहे हे दाखवण्याचे संकेत. 

ह्या पायरीसाठी काकांना आठवलेलं महाभारतातील उदाहरण - "मग काय झालं, संजया?" हा धृतराष्ट्राचा प्रश्नच एक प्रकारचा हुंकार होता, जो संजयाला बोलतं ठेवत होता. 

टीप - "हो का," "अरे वा," "हम्म" वगैरे हुंकार नेमक्या कुठल्या वेळी द्यावे ह्याचा विचार. 

सराव - शेजारच्या काकूंच्या गप्पा (भाजीवाला, सोसायटीचं राजकारण) ऐकताना योग्य वेळी हुंकार देण्याचा सराव.

लोकांची प्रतिक्रिया - शेजारच्या काकू एकदा वैतागून म्हणाल्या, "काका, खरंच ऐकताय का?"

ही पायरी गाठल्याचं लक्षण - लोकांना वाटू लागलं की आपलं म्हणणं खरंच कोणीतरी ऐकतंय, आणि हळूहळू लोक काकांकडे मन मोकळं करू लागले.

तिसरी पायरी — निळा पट्टा (Blue Belt): "प्रतिबिंब तंत्र"

संदर्भ - Center for Creative Leadership (CCL) चं Active listening

अभ्यासातून काय वेचावं - आरसा तंत्र (Mirroring) कसं वापरावं (उदा.समोरच्याचे मूळ शब्द जसेच्या तसे पुन्हा बोलणे, किंवा त्यांचा नेमका दृष्टिकोन पडताळून पाहणे.) 

ह्या पायरीसाठी काकांना आठवलेलं महाभारतातील उदाहरण - हस्तिनापूरच्या सभेत जाण्याआधी कृष्णाने दोन्ही बाजूंची गाऱ्हाणी नीट समजून घेतली आणि आपल्या बोलण्यात दोन्ही बाजूंचं म्हणणं अचूक प्रतिबिंबित केलं. नंतरच पुढचं पाऊल टाकलं.

टीप - कृष्णाच्या आरसा तंत्रामुळे धृतराष्ट्र, द्रोण, विदूर, भीष्म वगैरेंना वाटलं की कृष्णाला आपल्या भावना नीट कळल्या आहेत.

सराव - शेजारच्या काकूंच्या गप्पा ऐकताना हुंकारा ऐवजी त्यांचं वाक्य प्रतिबिंबित करून परत सांगण्याचा सराव.

लोकांची प्रतिक्रिया - काका समोरच्याचं बोलणं शब्दांऐवजी अर्थाच्या पातळीवर परत सांगायला शिकले. "म्हणजे तुला असं म्ह्नणायचं आहे की...". आवडलं लोकांना.

ही पायरी गाठल्याचं लक्षण - “लोक आता सहज बोलता बोलता थांबून विचारू लागले, 'हो ना काका, समजलं ना मला काय म्हणायचंय ते?'” काकांच्या सहवासामुळे इष्ट मित्रामध्ये झालेला बदल

लाभ — गैरसमज कमी होऊ लागले, कारण समोरच्याला वाटू लागलं की आपण नीट समजलो गेलोय.

चौथी पायरी — तपकिरी पट्टा (Brown Belt): "प्रश्नास्त्र"

संदर्भ - रिचर्ड पॉल आणि लिंडा एल्डर - सॉक्रेटिक प्रश्नपद्धती आजच्या युगात कशी वापरावी 

अभ्यासातून काय वेचावं - प्रश्न का विचारावे आणि कसे विचारावे ह्याचं तंत्र 

ह्या पायरीसाठी काकांना आठवलेलं महाभारतातील उदाहरण - ही महाभारतातल्या वनपर्वातली गोष्ट आहे. ह्या गोष्टीचा सारांश असा - युधिष्ठिराला एका तळ्याचा मालक असलेल्या एका यक्षाने शंभर प्रश्न विचारले. युधिष्ठिराने दिलेल्या उत्तराने यक्ष खूष झाला आणि त्याने युधिष्ठिराच्या सगळया भावंडाना परत जिवंत केले.

टीप - प्रश्नाचे उत्तर कसे द्यावे ह्याचंही एक शास्त्र आहे. 

सराव - कट्ट्यावर होणाऱ्या गप्पांमध्ये मुद्दाम प्रश्न विचारून समोरच्याला बोलतं ठेवण्याचा सराव.

लोकांची प्रतिक्रिया - “तुम्ही प्रश्न विचारून आम्हाला भंडावून सोडता.” हे ऐकून काकांनी आपण असे का करतो हेही सांगायला सुरुवात केली.

ही पायरी गाठल्याचं लक्षण - लोक आता काकांकडे सल्ला मागायला येऊ लागले

पाचवी पायरी — काळा पट्टा (Black Belt): "कर्णकुंडलिनी सिद्धी"

संदर्भ - जेरार्ड एगनचं Skilled Helper मॉडेल

अभ्यासातून काय वेचावं - थेरपिस्ट, कोचेस आणि मॅनेजर ह्यांनी वापरायची समुपदेशन (काउन्सेलिंग) करण्याची तीन-टप्प्यांची पद्धत.

ह्या पायरीसाठी काकांना आठवलेलं महाभारतातील उदाहरण - कृष्णाने अर्जुनाचा संपूर्ण विषाद, न अडवता, न घाई करता ऐकून घेतला. आणि तिथेच भगवद्गीतेचा जन्म झाला.

टीप - आधी ऐका मग बका 

सराव - कोणीही सल्ला मागितल्यास एगनचं तीन-टप्प्यांचं मॉडेल वापरण्याचा सराव.

लोकांची प्रतिक्रिया - सुनेचं आणि सासूबाईंचं काहीतरी बिनसलं होतं. दोघीही काकांकडे स्वतंत्रपणे 'गाऱ्हाणं' सांगायला आल्या. त्यांनी त्यांना एगन जेरार्डचं मॉडेल वापरून हे प्रश्न विचारले - 

टप्पा १ सद्यस्थिती - "नक्की काय झालं, सुरुवातीपासून सांगाल का?" "तुम्हाला याबद्दल सगळ्यात जास्त त्रास कशाचा होतोय?" 

टप्पा २ इच्छित स्थिती - "तुमच्यासाठी 'योग्य तोडगा' म्हणजे नक्की काय असेल?" 

टप्पा ३ तिथे पोहोचायचं कसं? - "जर उद्या तुम्हीच पुढाकार घेतला, तर पहिलं पाऊल काय असेल?". हे प्रश्न विचारून काकांनी त्यांच्याकडून उत्तर ‘उगवून’ घेतलं.

ही पायरी गाठल्याचं लक्षण - जे लोक आधी काकांना टाळत, तेच आता 'काकांशी जरा बोलून येतो' म्हणत घराबाहेर पडू लागले. आणि ज्या एका वाक्यामुळे हा प्रवास सुरू झाला होता — 'म्हातारी माणसं फार बोलतात' — ते वाक्य आता कोणीच काकांबद्दल बोलत नव्हतं.

👂

पाचवी पायरी गाठल्यावर काका अभिमानाने म्हणाले, "मी आज कर्णकुंडलिनी सिद्धीचा ब्लॅक बेल्ट झालो!"


No comments:

About Me

My photo
Bangalore, Karnataka, India
My purpose is to manufacture success and happiness