Tuesday, 22 September 2026

आगळे वेगळे पुणेकर - किस्सा क्र. ६ - अहंकार सोडा🍾



 

काकांच्या निवृत्तीनंतर त्यांचा एक मित्र  मुंबईहून त्यांना भेटायला आला. 

गप्पा मारताना मित्रानं सहज विचारलं, "मग? रिटायरमेंटनंतर काय?"

"विचार चालू आहे." काका म्हणाले.

मित्राने काकांसाठी आणलेली भेटवस्तू त्यांच्या हातात दिली.

काकांनी पॅकिंग उघडलं, तर आत 'अष्टावक्र गीता' नावाचं एक पुस्तक होतं. 

"थँक्यू, पण मला नकोय हे. मी नाही असली पुस्तकं वाचत. मला फारच म्हातारं झाल्यासारखं वाटतं."

मित्र त्याला पटवून देत सविस्तर सांगू लागला, "हे पुस्तक म्हणजे अध्यात्मातल्या 'पोस्ट-ग्रेज्युएट्स'साठी आहे. थेट आत्मा आणि ब्रह्माच्या अंतिम सत्यावर बोट ठेवतं. ज्यांनी सांसारिक अनुभव घेतले आहेत आणि जे सखोल आत्मचिंतनासाठी तयार आहेत, त्यांच्यासाठी हे अगदी योग्य आहे. वाढत्या वयासोबत माणसाला तीव्र विरक्ती शिकवतं, सांसारिक ओळख सोडून द्यायला मदत करतं आणि आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आंतरिक शांती देतं..."

काकांनी मित्राचं प्रवचन मधेच थांबवलं, "वाचतो बरें. पण पूर्ण वाचेन ह्याची हमी देत नाही. मी कुठवर आलो, काय आवडलं असला पाठपुरावा नको, समजलं?"

काका, "तुझ्या बोलण्यावरून एक कळलंय की तू ह्या विषयातला तज्ज्ञ आहेस. आता मला तुझी परीक्षा घेऊ दे. सांग बरं, ह्या पुस्तकाचं सार काय आहे? फक्त एका वाक्यात." “फक्त एका वाक्यातच.” 

मित्राने विचार केला आणि म्हणाला, "अहंकार कवटाळू नका."

"छान! आता दोन वाक्यांत सांग, मी हे पुस्तक का वाचलं पाहिजे?"

मित्र म्हणाला, "पहिलं असं, हे पुस्तक तुला दाखवून देईल की तू 'थकणारं शरीर किंवा बदलणारं मन' नसून शाश्वत आत्मा आहेस. दुसरं म्हणजे, ते तुला शुद्ध आनंदात पूर्णपणे स्थिर करून भूतकाळातील पश्चात्ताप आणि भविष्यातील चिंता ह्यापासून मुक्त करेल."

"झकास. आता मला सांग, हे पुस्तक मला देऊन तुला काय फायदा होणार? पण फक्त तीन वाक्यांत बरं!”

मित्र खुर्चीवरून उठला. "च्यायला, हे काय लावलंयस? आणखी थोडं थांबलो तर चार वाक्यांत हे सांग, पाच वाक्यात ते सांग असं चऱ्हाट लावशील. बास आता. पट्कन जेवायला वाढ. आणखी एकही शब्द नको!"

"बरं  बरं, वाचेन मी," असं म्हणत काकांनी विषय बदलला.

रात्री झोपण्यापूर्वी काकांनी अष्टावक्रगीतेची पानं चाळायला सुरुवात केली. “२९८ श्लोक, २० अध्याय? बापरे!” 

पहिले पाच श्लोक वाचल्यावर काकांचं डोकं चक्रावून गेलं - “राजा जनकाने आत्मज्ञान, मुक्ती आणि वैराग्य प्राप्त करण्याचा मार्ग विचारला. त्यावर ऋषी अष्टावक्र यांनी विषसदृश विषयत्याग, क्षमा, दया, सत्य यांसारख्या गुणांचं सेवन असा उपदेश केला. तसंच, पंचतत्त्वांपासून व शरीरापासून वेगळं करून स्वतःला चैतन्यस्वरूप साक्षी समजल्यास मनुष्य मुक्त आणि सुखी होऊ शकतो.”

प्रकरण जरा जड होतं. काकांनी पुस्तक बंद केलं आणि झोपी गेले.

काकांना भलतीच विचित्र स्वप्नं पडू लागली.

पहिलं स्वप्न होतं - पंचमहाभूतांचं न्यायालय: काकांना एका भव्य न्यायालयात उभं केलं होतं. पंचमहाभूतांनी त्यांच्यावर केस ठोकली होती. ऋषी अष्टावक्रांसारखे दिसणारे न्यायाधीश हातातला हातोडा टेबलावर आपटत होते. पंचतत्त्वांची फिर्याद न्यायाधीश महोदयांनी नीट ऐकली. आणि काकांच्या विरोधात निकाल दिला.

"पाचही तत्त्वांनी आपली संपत्ती काकांकडून ताबडतोब परत घ्यावी." असा आदेश दिला. क्षणात काकांचे अवयव  वितळून वाफेच्या रूपात हवेत विरघळू लागले. 

🍾

काकांनी कूस बदलली. 

पण स्वप्नं त्यांचा पिच्छा सोडत नव्हती. 

अजून एक स्वप्न थोडक्यात सांगतो - काका गाडी चालवतायत. टोल नाक्यावर त्यांना थांबवलं जातंय, "पुढे जाण्यासाठी तुम्हाला विश्वाचं अंतिम सत्य सांगावं लागेल. पण उत्तर शून्य शब्दात द्यायचंय.” काका युक्तिवाद करण्यासाठी तोंड उघडतात, पण शब्द फुटत नाहीयेत.

काका दचकून जागे झाले. 

'अहंकार सोडा' हे गीतेचं सार अजूनही त्यांच्या डोळ्यांसमोर नाचत होतं. अचानक डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. 

'अहंकार सोडा' ह्या नावाचा सोडा विकायचा! अशी आयडियेची कल्पना सुचल्यामुळे काका खुश झाले. आता काकांना आयुष्याचं ध्येय मिळालं होतं.

त्यांनी स्टॉल थाटला आणि नाव दिलं 'अहंकार सोडा'. 

ते आता अष्टावक्र गीता शब्दन् शब्द वाचू लागले. त्यातल्या कोणत्या गोष्टी आपल्या सोड्याच्या धंद्यात कशा वापरता येतील याचा विचार करू लागले.

एक नवीन विचार स्फुरला. सोड्यासोबत अष्टावक्र गीतेतले अनमोल विचार 'चिनी फॉर्च्यून कुकी'त (Chinese fortune cookie) टाकून देऊ या. म्हणजे लोकांना अष्टावक्र गीता पूर्ण वाचावीशी वाटेल. 

उदा.

- तुम्ही जन्मापासूनच मुक्त आहात, तुम्हाला फक्त त्याची जाणीव करून घ्यायची आहे.

- तुम्ही शरीर किंवा मन नसून, केवळ एक शुद्ध आणि अलिप्त साक्षीदार आहात.

- संपूर्ण विश्व हे तुमच्याच चेतनेतून निर्माण झाले आहे. वगैरे...

लोकांची अष्टावक्र गीतेविषयी उत्कंठा वाढल्याने काकांनी भरपूर प्रती दुकानात ठेवायला सुरुवात केली आहे.

धंदा वाढला. वीकएंडला लोक ‘अहंकार सोडा’ घरी मागवू लागले, मादक पेयाला कंपनी म्हणून. 

काकांच्या सोडा ब्रॅंडिंग वर चर्चा घरोघरी सुरु झाल्या. नवीन कल्पनांना ऊत आला.  

लोकांनी काकांना ‘अहंकार सोडा’ ट्रेडमार्क करायचा सल्ला दिला. कुणी सुचवलं, “आणखी काही नवीन पेयं काढा”. हे ऐकून काकांनी पेयांचा सपाटा लावला - 'मोह-माया मोहितो', 'मुक्ती मार्गारीटा', 'वैराग्य व्हर्जिन मेरी'.... यादी मोठी आहे. अधिक माहितीसाठी त्यांच्या स्टालवर जाऊनच वाचा.

कुणी म्हटलं, "काका, टीशर्ट पण काढा” काकांनी कहाडला - 

पहिली ओळ ‘अहंकार सोडा', त्याच्या खाली - ‘सो हो ड ला’ 

हल्ली पोरं-टोरं काकांबरोबर सेल्फी घेतायत आणि इंस्टावर टाकताहेत.

तो मुंबईचा मित्र काकांना भेटायला कधी काळी परत आला तर काय म्हणेल, हे त्या अष्टावक्रालाच ठाऊक! 

हे तरी म्हणेलच, "राजा, अष्टावक्रांनी अहंकार सोडायला सांगितला होता, विकायला नाही!"



No comments:

About Me

My photo
Bangalore, Karnataka, India
My purpose is to manufacture success and happiness