आजचा किस्सा प्रिया-मंदार ह्या संशोधक दाम्पत्याचा.
प्रिया आणि मंदार कोटस्थाने तसे पुण्याचेच. पण मंदारच्या नोकरीमुळे त्यांना देशात, परदेशात बरंच फिरावं लागलं.
प्रत्येक ठिकाणी प्रियाच्या हातच्या चविष्ट खाद्यपदार्थांमुळे ते तिथल्या मराठी कुटुंबांचे भाग बनले.
पुण्याला परतल्यावर त्यांचा एक अमेरिकन मित्र त्यांना भेटायला आला होता. पुणं दाखवताना ते त्याला बंड गार्डनच्या पेशवा दफ्तरला घेऊन गेले. तिकडे त्यांना १७८३ मध्ये झालेल्या सवाई माधवराव पेशवे यांच्या विवाह सोहळ्याबद्दलचं नाना फडणवीसांचं एक २२ पानी हस्तलिखित हाती लागलं. एका ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे 'पान-विडे' बनवण्याची पद्धतही नमूद केली होती. इतकं ते सविस्तर होतं.
मंदारच्या मनात विचार घोळू लागले. फडणवीसांच्या हस्तलिखिताचा काही तरी उपयोग व्हायला हवा हे त्यानं नक्की केलं.
प्रियाशी चर्चा करताना, “आपण फक्त पेशवाई खाद्य पुरवायचं” हा विषय पक्का झाला.
मग संशोधनाला सुरुवात झाली.
१. त्यावेळी कुठलं रॉ मटिरियल उपलब्ध होतं?
२. पेशवे दिवसभर काय खायचे आणि प्यायचे?
३. त्यावेळी कुठल्या प्रकारची भांडी स्वयंपाकासाठी वापरत?
वगैरे
ह्या संशोधनात त्यांना बरीच आगळी वेगळी माहिती मिळाली -
पेशवेकालीन रॉ मटिरियल -
१. शिवाजी महाराजांनी ठेचा खाल्ला असल्याची शक्यता आहे (कारण मिरची पोर्तुगीजांनी भारतात १६व्या शतकात आणली होती), पण टिळकांनी साबुदाण्याची खिचडी खाल्ली नव्हती हे नक्की (साबुदाणा खऱ्या अर्थाने १९४० आणि १९५० च्या दशकात लोकांच्या रोजच्या आहारात आणि उपवासाच्या पदार्थांमध्ये आला)
२. फ्लॉवर, फरसबी, मटार, गाजर, बीट वगैरे पेशव्यांनी ऐकलं नव्हतं. टॉमॅटो नक्की खाल्ला नव्हता (टॉमॅटो जेव्हा भारतात आला तेव्हा त्याला मांसफळ असं म्हणत)
३. पेशव्यांनी बटाट्याचा कीस खाल्ल्याचं आपल्या संशोधक दाम्पत्याला कुठे आढळलं नाही (बटाटा भारतात १७व्या शतकात आला पण पुण्याला यायला त्याला दोनशे वर्षं लागली)
पेशवे दिवसभर काय खायचे आणि प्यायचे? -
१. फक्त दोन जेवणं (सकाळी १० ते १२, रात्री ७ ते ९) आणि मधे ताक, सरबत, उसाचा रस, फळं (अफगाणिस्तान मधून बरीच फळं पुण्यात येत) वगैरे
२. बेत - वरण भात तूप, भाकरी, दही/ ताक. पावसाळी भाज्या - कंटोळी, टाकळा इत्यादी. हिवाळी भाज्या - मुळा, मेथी इत्यादी. उन्हाळी भाज्या - भोपळा, अळू वगैरे. गोड धोड - पुरण पोळी किंवा श्रीखंड. आणि नंतर त्रयोदशगुणी विडा.
३. उपवासाच्या दिवशी शिंगाडे, रताळे वगैरे
४. आहारावर वैद्यांचं बारीक लक्ष असे. आयुर्वेदानुसार आहार घेतला जायचा
नंतर प्रिया-मंदारनं रघुनाथ नवहस्ते ह्यांच्या ‘भोजन कुतूहलं’ ग्रंथाची पारायणं करून त्यांच्या ४०० पाककृती ‘हाताळल्या’; अहो, पाक साहित्यसुद्धा रघुनाथशास्त्रींच्या पद्धतीनं मोजून (म्हणजे वजनासाठी ग्रॅम नाही, गुंज-मासा… आणि द्रव साहित्यासाठी शाण-शुक्ती इत्यादी) प्रॅक्टिस केली. हे म्हणजे अल्टिमेट!
आणि ह्या सर्व संशोधनानंतर कोटस्थाने दाम्पत्याचं ब्रॅंडिंगवर काम सुरु झालं, मेन्यू ठरवला आणि भगीरथ प्रयत्नांती “फक्त पेशवाई पदार्थ” पुणेकरांसमोर सादर झाला.
लोकांनी ‘फक्त’ हा शब्द काढून टाकण्यासाठी बरीच घासाघीस केली. पण प्रिया-मंदार बधले नाहीत. नाना फडणवीसांचं हस्तलिखित अमर करणं हा त्यांचा हट्ट होता.
आणि अशा रीतीनं, प्रिया-मंदारच्या परिश्रमांमुळे, नाना फडणवीसांच्या २२ पानी लेखनाचं चीज झालं आणि रघुनाथशास्त्र्यांना पब्लिसिटी लाभली.
आणि ज्या अमेरिकन मित्रामुळं हे रामायण घडलं, त्याला प्रिया-मंदारनी रघुनाथ शास्त्र्यांची कृती वापरून केलेले शंखपाळ (शंकरपाळी) धाडून दिलं आणि सोबत एक भलं मोठं थँक्यू पत्रही.
हा किस्सा खऱ्याखुऱ्या प्रिया-मंदारना समर्पित. किस्सा काल्पनिक आहे; पण प्रियाच्या हातची चव खरी आहे आणि मंदारचा संशोधनाचा उत्साहही खरा आहे😋.


No comments:
Post a Comment