पुण्यात एक ताई आहे, प्राजक्ता. प्राजक्ताला पाळीव प्राण्यांबरोबर वेळ घालवायला फार आवडायचं.
कॉलेजमध्ये असताना तिने पेट्-सिटिंग करायला सुरुवात केली. छंदही झाला, चार पैसेही मिळायचे.
पाळीव प्राण्यांचे पालक सुट्टीत परगावी जाताना प्राजक्ताला बोलवायचे. प्राजक्ता खाऊ-पिऊ द्यायची, त्यांच्याशी खेळायची, गप्पा मारायची. म्हणजे प्राण्यांशी.
काम आवडीचं होतं. जोखमीचं होतं. प्राजक्ता फार प्रेमानं प्राण्यांची काळजी घ्यायची. पालकांची प्राजक्ताबद्दल आस्था होती. क्वचित कडू अनुभव यायचे म्हणा. पण फार थोडे. कधी पालक पुण्याच्या एका टोकाला राहात आणि घराची किल्ली दुसऱ्या टोकाला ठेवून जात. “ताई, किल्ली बहिणीकडे विमान नगरला ठेवलीये. निघताना फार घाई झाली. सॉरी . हा बहिणीचा पत्ता ." मग ही बिचारी तंगडत (म्हणजे तिच्या दुचाकीवर) चावी आणायला जायची. कधी फोन यायचा, “ताई, जाताना जरा पेट् फूड घेऊन जा. आणायचं राहून गेलं .”
आणि एकदा तर ती पालकांच्या घरी पोहोचल्यावर तिला त्यांनी सांगितलं, “सॉरी. आम्हाला तुमच्यापेक्षा कमी पैसे घेणारी बाई मिळालीय. फोन करून कळवणारच होते .”
🐕🐈
कॉलेज संपल्या संपल्या लग्न झालं. काही दिवसांनी घरी बाळही आलं. प्राजक्ता संसारात रमली.
बाळ अंगावेगळं झालं. प्राजक्ताला थोडा मोकळा वेळ मिळू लागला. सौरभ बोथराचं योग सेशन सुरु झालं, सुनीती लिमयेचा प्राणायाम क्लास व्हायला लागला.
आणि एक दिवस अचानक पेट् सिटिंगचा विचार प्राजक्ताच्या मनात आला. "सुरु करूया का परत?"
पण मग लगेच काही जुन्या कुट्ट आठवणी जाग्या झाल्या - किल्ल्या, पुण्याची धावपळ, .... परत बाळ कुठं ठेवायचं हा प्रश्न होताच.
एक कल्पना सुचली. “लोक योग आणि प्राणायाम झूमवर करू शकतात, तर प्राण्यांशी गप्पा मारायला त्यांच्या घरी जायची गरज काय? झूमवर करू.”
ठरलं. झूम कॉल वरून प्राण्यांशी गप्पा मारायच्या.
सुरुवात झाली पण जम नीट बसत नव्हता. "आम्ही पालक घरी असताना तुमची गरज काय? आम्ही मारू की गप्पा ."
एक दोघांनी गंमत म्हणून हो म्हटलं. पण गप्पा किती वेळ मारणार? आणि दररोज बोलणार तरी काय?
गप्पा नकोत, त्यांना गोष्टी सांगूया असा तिने घाट घातला. त्यासुद्धा इसापनीतीतल्या. म्हणजे ऐकणारेही प्राणी आणि गोष्टीतही प्राणी. झकास.
खरं म्हणजे प्राण्यांना गप्पा काय, पॉलिटिक्स काय, गोष्टी काय आणि बडबडगीतं काय. सगळं सारखंच. पण कोण जाणे, पुण्याच्या प्राणी पालकांनी कल्पना उचलून धरली.
'प्राण्यांना इसापनीती सांगणारी प्राजक्ता' अशी प्राजक्ताची नवीन ओळख झाली.
इसापनीतीच्या गोष्टींचा तुडवडा नव्हता. चार पाचशे तरी नक्कीच असतील.
हळूहळू नियमही आले.
अगदी मजेदार -
- गोष्टी ऐकताना कुत्रा झोपल्यास फी कमी होणार नाही
- "मांजर मधेच उठून गेलं, पैसे अर्धेच मिळतील" अश्या सबबी चालणार नाहीत
- कुत्र्याने हात मारून मोबाईल मोडल्यास कंपनी जबाबदार नाही
- व्हिडीओ सतत चालू ठेवावा. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आम्हाला कळले पाहिजेत
- शेजार पाजारचे प्राणी आणून बसवून गर्दी वाढवू नये. तुमच्या छकुल्याचं मन विचलीत होईल
- तुमच्या बाळगोपाळांनी प्राण्याबरोबर बसून गोष्टी ऐकल्यास आमची ना नाही. त्याचे वेगळे पैसे नाहीत.
परदेशातूनही मागणी आली. विशेषतः शेवटचा नियम वाचून. --> "मुलांचं मराठी सुधारेल आणि गोष्टी ऐकून वेळही चांगला जाईल."
परदेशातून मागणी वाढल्यावर प्राजक्तानं थोडंफार वाचन करायला सुरुवात केली.
"तुमच्या गोष्टीत फसवाफसवी असते (उदा. कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट), हिंसाचार असतो (उदा.लांडगा आणि कोकरू ). हे सगळं ऐकून मुलांना ट्रॉमा झालाय. कोर्टात भेटा." - बाप रे! असले वादंग नकोत.
शोधता शोधता तिला The Æsop for Children नावाची एक छान वेबसाइट सापडली. तिथे मुलांसाठी निवडून ठेवलेल्या जवळजवळ १५० इसापनीतीच्या गोष्टी होत्या. "वाचले बाबा!"
तिने केलेल्या ह्या बदलावर गोष्टी ऐकणाऱ्या कुत्र्यामांजरांकडून काही ऑब्जेक्शन आलं नाही हा एक महत्त्वाचा भाग.
🐕🐈
कळवण्यास आनंद वाटतोय, प्राण्यांना इसापनीती सांगणारी प्राजक्ता आता भयंकर बिझी झाली आहे.
ती आता एकएकट्याला गोष्ट सांगत नाही, बॅच बाय बॅच सांगते.
प्राजक्ता आता प्राण्यांची सौरभ बोथरा झाली आहे.
आहे की नाही आगळं वेगळं पुणं?
(टीप: ही कथा मनोरंजनासाठी रचलेली एक काल्पनिक रचना आहे हे जाणकारांना उमजले असेलच. पण कोणाला असा क्लास सुरू करायचा असल्यास नक्की करा! खरं तर त्यासाठीच लिहिलीये. 😉 मला रॉयल्टी दिल्यास नाकारणार नाही.)


No comments:
Post a Comment