१८१८ साली यंत्रज्ञ सर विल्यम कबिट्ट यांनी बनवलेली एक गिरणी इंग्लंड मधल्या एका तुरुंगात लावली गेली. उद्देश हा की कैद्यांना काही तरी उद्योग मिळावा.
ही बातमी एका काकांच्या नजरेला पडली आणि त्यांच्या मनात एक तुफान घुमायला लागलं.
कैदी जर पिठाची गिरणी चालवतात तर आपणही चालवू शकतो. तेव्हढच काय ते पीठ दळत असतील तर आपण तेलही काढू शकतो.
झालं. काकांनी हे करायचं ठरवलं. काका इंजिनिअर होते. यंत्रं बनवणे म्हणजे त्यांचा डाव्या हाताचा मळ.
ड्रॉईंग बोर्डवर यंत्रांचे आराखडे दिसायला लागले. पिठाच्या गिरणीचा बनला, तेलाच्या घाणीचाही बनला.
घरात दोन्हीही सुरु करणं शक्य नव्हतं. तेलाची घाणी कुणा मित्राच्या घरी ठेऊ असा त्यांचा विचार पडला. पण कोणी बळी पडले नाहीत.
एका मित्रानं सुचवलं की हे सगळं घरात करण्यापेक्षा एक जिम का काढत नाहीस. मी नक्की मदत करेन. ढासू आयडिया आहे.
लोकांचा व्यायामही होईल आणि तेल पीठही मिळेल. ज्यांना तेल हवं असेल ते भुईमूग घेऊन येतील, कधी पीठ हवं असेल तर गहू घेऊन येतील.
दोघांनी ठरवलं की ही जिमगिरणी साधारण अशी असेल - ट्रेडमिलला एक छोटासा जनरेटर जोडायचा. जनरेटरला मोटर. माणूस चालला की ट्रेडमिल फिरणार. ट्रेडमिल फिरली की मोटर फिरणार. मोटर फिरली की पीठ निघणार.
थोडक्यात काय, ही फक्त जिम नव्हती अन्ननिर्मिती व्यवस्था सुद्धा होती.
काकांना आयडिया चक्क आवडली.
म्हणजे आपल्याकडे येणारे व्यायामपटू किती मैल चालले असं म्हणणार नाहीत. एक किलो पीठ चाललो किंवा एक लीटर तेल चालले असं म्हणतील. वा:
दोघांनी अभ्यासाला सुरुवात केली. उदा. एक लिटर तेलासाठी किती चालावं लागेल, एक किलो पिठासाठी किती धावावं लागेल वगैरे वगैरे. उदा. बैलावर चालणारी घाणी एका तासात १२ किलो भुईमुगातून ५ लीटर तेल काढते. त्यासाठी बैलाला सुमारे ३.५ किलोमीटर फिरावं लागतं (आपल्या व्यायामपटूना फिरावं लागणार नव्हतं. ट्रेड मिलवर चालावं लागणार होतं). एक किलो गव्हाच्या पिठासाठी किती पळावं लागणार ह्याची काही त्यांना माहिती मिळाली नाही. पुढे आपोआप कळेलच म्हणा असा त्यांचा विचार झाला.
स्वच्छता हा एक मोठा प्रश्न होता. घामेजलेल्या हातानी लोकांनी उपकरणाला हात न लावता त्यांना तेल पीठ कसं मिळेल त्याच्यावरही तोडगा हवा होता.
असं ठरलं की व्यायाम करणाऱ्याने घाणीला किंवा गिरणीला हात लावायचा नाही. काकांकडे गहू/ भुईमूग सोपवून ट्रेडमिलवर चढायचं. गहू संपेपर्यंत चालायचं किंवा पूर्ण तेल निघेपर्यंत पळायचं आणि घरी जाताना आपलं पीठ, तेल काकांकडून घेऊन जायचं. अगदी दुरून, सांभाळून.
म्हणजे घाणीला किंवा गिरणीला हात लावायचा प्रश्नच नाही.
हळू हळू गिरणी व्यायामशाळा लोकप्रिय होऊ लागली. व्यायामशाळेत नुसता घाम गाळण्याऐवजी, पीठ आणि तेल मिळण्याची कल्पना लोकांना भुरळ पाडणारी होती. अंतर मोजण्याऐवजी "एक किलो पीठ चालले" किंवा "एक लिटर तेल चाललो" असं म्हणण्याची संकल्पना भन्नाट होती.
काही लोक तर फक्त मशीन बघायला येत.
काही सभासदांनी विचारणा केली - फक्त गहू आणि भुईमूगच का? ज्वारी का नाही? तीळ का नाही? वगैरे.
आत्ता आली का पंचाईत?
काही म्हणाले, गिरण्यांची संख्या वाढवा. आम्हाला दुसऱ्याचं संपेपर्यंत नुस्तं बसून राहावं लागतं.
काकांनी ह्या सगळ्यावर काय तोडगे काढले ते सांगेन कधीतरी. सविस्तर.
मग, कधी जाताय गिरणी व्यायामशाळेत?
