अभ्यासक्रम
१. ह्या विषयाच्या व्याख्या पाठ करणं आणि ह्या गुणामुळे काय फायदे होतात ते समजून घेणं
२. ह्या विषयाचा एक सिद्धांत समजून घेऊन रोजच्या आयुष्यात वापरून बघणे आणि ह्या विषयावरची एखादी गोष्ट वाचणं
३. ह्या विषयाचं वेळापत्रक बनवणे आणि ह्या विषयावरचे थोरांचे बोल शोधणं
४. ह्या विषयावरचं नवीन तंत्र वापरून बघणं
५. ह्या विषयावरच्या काही पुस्तकांचे सारांश वाचणं
६. ह्या विषयावरच्या TED व्याख्यानांची यादी बनवणं आणि ती ऐकणं
७. ह्या विषयावरची मोबाईल apps शोधणे आणि वापरायचा यत्न करणं
८. हा विषय व्यापारात कसा वापरला गेला त्याच्या पाच गोष्टी (business stories) शोधणं
९. हा विषय समृद्ध करायला ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांना हुडकणं
१०. ह्या विषयाच्या तज्ञाला कुठले प्रश्न विचारल्यास आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल हे शोधून त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढणं
सराव (दररोज एक तास वेळ देणे)
पहिली १० मिनिटं - व्याख्या, पायऱ्या, महत्वाची तंत्रं (techniques) आणि थोरांचे बोल ह्याचं वाचन
११ ते २० मिनिटं - आतापर्यंत टिपलेली प्रगती वाचणे
२१ ते ४० मिनिटं - एखादं सदर वाचून त्याचा सारांश काढणे (सदरांची यादी बनवली आहे)
४१ ते ६० मिनिटं - ह्या विषयाचा सराव करणे (म्हणजे एखादं तंत्र वापरून पाहणं)
शंभर दिवसांचा प्रवास
दिवस २
आजचा विषय - समस्या सोडवण्याची क्षमता (problem solving skill)
आणि आजचं ध्येय - ह्या विषयाच्या व्याख्या पाठ करणं आणि ह्या गुणामुळे काय फायदे होतात ते समजून घेणं.
आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन.
तुमचा नम्र (म्हणजे पुढचे ९९ दिवस नम्र. नंतरची गॅरंटी नाही)
आजची प्रगती
व्याख्या - समस्येचं मूळ शोधण्याची आणि प्रभावी उपाय शोधण्याची क्षमता
वापरायची पद्धत -
प्रॅाब्लेम (समस्या) काय आहे ते व्यवस्थित लिहा
समस्या का निर्माण झाली ह्याचं मूळ कारण शोधून काढा
शोधलेलं मूळ कारण उपटून काढण्याचे जास्तीत जास्त उपाय लिहून काढा
प्रत्येक उपायाचे फायदे तोटे लिहून सर्व कागद
निर्णय घेणार्यांकडे सोपवा.
ह्या क्षमतेचे फायदे -
कुठल्याही गोष्टींचा विश्लेषणात्मक विचार करण्याचं तुमचं कसब वाढेल
लोकांमधे ‘ही एक गुंते सोडवणारी व्यक्ती आहे’ अशी मस्त प्रतिमा तयार होईल
आजचा अभ्यास करताना, निर्णय घेणं आणि समस्या सोडवणं हे एकसारखंच वाटू लागलं.
पण एक कळलं,
निर्णय घेण्यापूर्वी समस्या सोडवण्याची प्रक्रिया झालीच पाहिजे ह्याचा हट्ट धरला पाहिजे.
दिवस १२
माश्याचा सांगाडा (fishbone diagram) वापरून समस्या सोडवणार?
आजचा विषय - समस्या सोडवण्याची क्षमता (problem solving skill)
आणि आजचं ध्येय -
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. ह्या विषयाचा एक सिद्धांत समजून घेऊन रोजच्या आयुष्यात वापरून बघणे
३. ह्या विषयावरची एखादी गोष्ट वाचणे
आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन.
तुमचा नम्र
आजची प्रगती
ध्येय १. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
व्याख्या - समस्येचं मूळ शोधण्याची आणि प्रभावी उपाय शोधण्याची क्षमता
वापरायची पद्धत -
१. IRCP (Ideal - आदर्श, Reality - वस्तुस्थिती, Consequence - परिणाम, Proposal - प्रस्ताव)
तंत्र वापरून प्रॅाब्लेम (समस्या) काय आहे ते व्यवस्थित लिहा
२. एखादं तंत्र (technique/ model/ framework) वापरून समस्या का निर्माण झाली ह्याचं मूळ कारण शोधून काढा
३. शोधलेलं मूळ कारण उपटून काढण्याचे जास्तीत जास्त उपाय लिहून काढा
४. प्रत्येक उपायाचे फायदे तोटे लिहून सर्व कागद
निर्णय घेणाऱ्यांकडे सोपवा.
ध्येय २. ह्या विषयाचा एक सिद्धांत समजून घेऊन रोजच्या आयुष्यात वापरून बघणे
माश्याचा सांगाडा (fishbone diagram) हे तंत्र न अभ्यासता “पाचदा का?” हे वाचलं. त्याविषयी सांगतो.
तंत्राचं नाव - पाचदा का? (5Whys technique)
कुठल्याही समस्या सोडवताना बऱ्याचदा का का का असे विचारून भंडावल्यास, समस्येचे मूळ कारण समजून त्यावर तोडगा काढता येतो. हे शोधून काढलं साकिची तोयोडा ह्या जपानी इसमानं. १९३० साली. हे तंत्र आजही त्याच्या मुलाच्या कंपनीत (टोयोटा) वापरतात.
हे कंपनीत वापरायचं तंत्र माझ्या आयुष्यात आज वापरून बघतोय.
समस्या - बायको माझ्यावर सतत चिडते (कपोल कल्पित घटना बरं का😁)
IRCP पद्धतीने ही समस्या अशी मांडली -
Ideal state - आदर्श परिस्थिती -
घरातल्या सर्व जबाबदाऱ्या दोघांनी वाटून घेतल्यामुळे घरात सुख आणि शांती नांदत आहेत.
माझ्या नेहमीच्या पडक्या चेहऱ्याची जागा एका प्रसन्न, दैदिप्यमान चेहऱ्याने घेतली आहे.
शेजारच्यांनी मनोरंजन थांबल्यामुळे घरं विकायला काढली आहेत.
Reality - वस्तुस्थिती -
बाईच संसाराची गाडी ओढतायत्. बुवा दहा वेळा सांगितल्याशिवाय इकडची काडी तिकडे करत नाही.
Consequence - परिणाम
बाईला वाटत की आपलं नशीब फुटकं
बुवाला पण साधारण सेम वाटतंय
Proposal - प्रस्ताव
पाच का वापरून समस्येचे मूळ कारण शोधा
पहिला का - बायको सतत का चिडते?
उत्तर - नवरा घरचं एकही काम करत नाही
का?
त्याला कुठली कामं कधी करायची हेच कळत नाही
का?
कारण त्याच्या लक्षात राहात नाही
का?
कारण ते मी लिहून दिलं नाही
का?
मी का लिहू? त्याला हात नाहीये?
पाचव्या “का”ला उत्तर सापडलं.
नवऱ्याने गुपचुप कागद पेन घेऊन कामं आणि कामं करण्याच्या वेळा लिहून बरहुकूम तामील करावी.
ध्येय ३. ह्या विषयावरची एखादी गोष्ट वाचणे
ही गोष्ट वाचली - कुठली समस्या सोडवायला विष्णूला नरसिंहावतार घ्यावा लागला?
दिवस २२
१०० दिवसांचं ध्येय - दहा विषयांचा तज्ञ होणं 💪
पहिले दहा दिवस - दहा विषयांच्या व्याख्या आणि पायऱ्या लिहिल्या
नंतरचे दहा दिवस - प्रत्येक विषयातलं एकेक तंत्र वापरून पाहिलं
पुढचे दहा दिवस - प्रत्येक विषयाचं वेळापत्रक बनवायचं
आजचा विषय - समस्या सोडवण्याची क्षमता (problem solving skill)
आणि आजचं ध्येय -
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. ह्या विषयाचं वेळापत्रक बनवणे
३. ह्या विषयावरचे थोरांचे बोल शोधणे
आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन.
तुमचा नम्र
आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
काढल्या
२. ह्या विषयाचं वेळापत्रक बनवणे
एका तासाच्या अभ्यासाव्यतिरिक्त, ‘Project sleep’चा प्रयोग करणार. असं म्हणतात की आपण झोपलो तरी आपलं सुप्त मन (subconscious mind) झोपत नाही. त्यामुळे समस्या सोडवायची जबाबदारी झोपण्यापूर्वी सुप्त मनाला देऊ शकतो. पॅांडिचरीच्या मदरने लिहिलेला ह्या विषयीचा लेख वाचतोय.
३. ह्या विषयावरचे थोरांचे बोल शोधणे
हे बोल शोधले.
Henry J. Kaiser. "Problems are opportunities in work clothes." (समस्या म्हणजे कामाचा गणवेश घालून उभी ठाकलेली संधी होय)
Einstein. "If I had only one hour to save the world, I would spend fifty-five minutes defining the problem, and only five minutes finding the solution." (जर माझ्याकडे जगाला वाचवायला फक्त एक तास असेल तर मी पन्नास मिनिटं समस्येची व्याख्या करायला वापरेन आणि उरलेली दहा मिनिटं त्यावर उपाय शोधण्यात घालवेन.)
Jim Rohn - "To solve any problem, here are three questions to ask yourself. What could I do? What could I read? Whom could I ask?" (कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी, मी स्वतःला तीन प्रश्न विचारतो. मी काय करू शकतो? मी काय वाचू शकलो? मी कोणाला विचारू शकतो?)
दिवस ३२
Problem solving ह्या विषयावरचा एखादा चित्रपट माहिती आहे का? पहायला नक्की आवडेल.
Charlie and the Chocolate Factory आणि Rudy हे ह्या विषयीचे दोन चित्रपट शोधले. पहिला बघितला.
१०० दिवसांचं ध्येय - दहा विषयांचा तज्ञ होणं 💪
आजचा विषय क्र. ०२ समस्या सोडवण्याची क्षमता (problem solving skill)
आणि आजचं ध्येय -
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. ह्या विषयावरचं नवीन तंत्र वापरून बघणे (मागच्या वेळी 5 Whys हे तंत्र वापरून बघितलं होतं)
आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन.
तुमचा नम्र
आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
वाचून काढल्या
२. ह्या विषयावरचं नवीन तंत्र वापरून बघणे
Problem reversal technique (समस्या उलटसुलट करून बघणे) ह्या नावाचं तंत्र Charles Thompson ह्या लेखकाने मांडलं आहे.
ह्या तंत्राचं एक चांगलं उदाहरण हे आहे -
समस्या - कोविडकाळात मुलांना शाळेत कसं आणायचं?
उलटीपालटी करून (reverse करून) बनवलेली नवीन समस्या - शाळा मुलांकडे कशी जाईल?
ह्या नवीन विचारामुळे आॅनलाइन शाळा सुरू झाल्या
आता हे तंत्र माझ्या आयुष्यात कसं वापरायचं ते सुचेना. बऱ्याच विचारांती ही समस्या आठवली.
आणि सांगायला आनंद वाटतो की ही समस्या मी उलटपालट करून तिच्यावर उत्तर काढू शकलो💪
समस्या - मी बायकोला वेळच्यावेळी भेटवस्तू (gift) देत नाही
उलटीपालटी करून बनवलेली नवीन समस्या - बायको माझ्याकडून वेळच्यावेळी भेटवस्तू घेत नाही
ह्या नवीन विचारामुळे हा फरक पडेल -
१. भेटवस्तू बायकोने आधीच विकत घ्यावी (मस्त गिफ्टरॅप करून घ्यावी)
२. भेटवस्तू ज्या दिवशी द्यायची त्या दिवशी पहाटे पहाटे माझ्या उशीजवळ ठेवावी
३. त्यावर एक छोटी चिठ्ठी लाऊन ठेवावी उदा. अहो, आज माझा वाढदिवस आहे. ह्या चिठ्ठीखालचं गिफ्ट मला द्यावं ही विनंती.
४. बायकोला आवडीचं गिफ्ट मिळेल आणि तेही वेळच्या वेळी😀
Problem reversal technique वापरून एक मोठी समस्या मी अशी सोडवणार.
दिवस ४२
आजचा विषय (क्र. ०२) समस्या सोडवण्याची क्षमता (problem-solving skill)
आणि आजचं ध्येय -
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. ह्या विषयावरच्या पुस्तकांचे सारांश वाचणे
आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन.
तुमचा नम्र
आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे - वाचून काढल्या
२. ह्या विषयावरच्या पुस्तकांचे सारांश वाचणे
ह्या दोन पुस्तकांचे सारांश वाचले.
पहिलं पुस्तक - 'The Art of Thinking Clearly' by Rolf Dobelli.
राॅल्फ म्हणतो की आपल्या मनातले पूर्वग्रह (biases) हे समस्या सोडवताना येणारे मोठे अडथळे आहेत. त्याच्या पुस्तकात त्याने ९९ प्रकारचे पूर्वग्रह मांडले आहेत.
हे समजून घेऊनच समस्या सोडवायला घ्यावी असं तो म्हणतो.
काही आवडलेले पूर्वग्रह -
पुष्टीकरण पूर्वग्रह (confirmation bias) ही सर्व गैरसमजांची जननी आहे. कुठलीही माहिती आपल्या विद्यमान सिद्धांतांशी ती सुसंगत कशी होईल हे आपल्या मनाला पटवणारे विचार म्हणजे पुष्टीकरण पूर्वाग्रह. उदा. आपल्या आवडीच्या नेत्याविषयी चांगले लिहिलेलं वाचलं की ते आपल्याला पटतं. जे लिहिलं आहे त्याची आपण शहानिशा करत नाही कारण तो नेता आपल्याला आवडतो हे आपल्या दृष्टीने महत्वाचं असतं.
जिव्हाळा (affinity bias) - ह्याचं उत्तम उदाहरण कामाच्या मुलाखतीच्या वेळी दिसून येतं. आपल्या गावचा, आपल्या काॅलेजचा, आपला जातभाई असल्या पूर्वग्रहामुळे बऱ्याच निवडी होतात.
अख्खं पुस्तकच इकडे सापडलं - The art of thinking clearly by Rolf Dobelli
दुसरं पुस्तक - Cracked it! By Bernard Garrette; Corey Phelps; Olivier Sibony
ह्या पुस्तकातली टोस्का (TOSCA) हे समस्या नीटपणे मांडण्याचं तंत्र चांगलं वाटलं.
ह्या सदरात पुस्तकाविषयी भरगच्च माहिती दिली आहे -
दिवस ५२
आजचा विषय (क्र. ०२) समस्या सोडवण्याची क्षमता (problem solving skill)
आणि आजचं ध्येय -
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. ह्या विषयावरच्या TED व्याख्यानांची यादी बनवणे
आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन.
तुमचा नम्र
आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे - वाचून काढल्या
२. ह्या विषयावरच्या TED व्याख्यानांचे सारांश काढणे
पहिलं भाषण - See What You Think: A recipe for problem solving by Mark Sylvester, Chef, Founder of computer animation company, Alias|Wavefront and Storytelling Company.
सारांश
मार्क सिल्वेस्टर आधी एक शेफ होता. त्यानंतर त्याने एक ॲनिमेशन कंपनी काढली. त्याला संगणकाचं अजिबात ज्ञान नव्हतं. पण समस्या कश्या सोडवायच्या त्याचं उत्तम ज्ञान त्याच्याकडे होतं. तो म्हणतो, जे तुम्हाला करायचं आहे त्याचं चित्रं, त्या ध्येयाकडे जाणारा रस्ता हे डोळ्यांसमोर आणा (When you don't know where to begin, picture your path and you will own the outcome),
1. मोठा श्वास घ्या म्हणजे तुम्ही थोडे स्थिर व्हाल
2. जे जे माहिती आहे आणि जे जे माहित करून घ्यायचं आहे त्याची यादी बनवा
3. प्रत्येक आयटम समोर कोण (सांगेल), काय, कुठे हे लिहून ठेवा
4. एका तक्त्यावर डाव्या खालच्या अंगाला स्टार्ट डेट आणि वरच्या उजव्या अंगाला खतम डेट टाकून ह्या रेघेवर वर लिहिलेले सगळे आयटम टाका
५. तो तक्ता भिंतीला टांगून पहिलं पाऊल टाका
दुसरं भाषण - Designers -- think big! by Tim Brown, CEO, IDEO
सारांश -
डिझाइन थिंकिंग ह्या नवीन संकल्पनेचे जनक म्हणजे IDEO company.
डिझाइन थिंकिंगच्या पाच पायऱ्या तो सांगतो.
१. समस्या सोडवण्यासाठी जे तुम्ही बनवता ते वापरणाऱ्याच्या तीन मागण्या तुम्ही पुरवायला हव्यात - त्यांची इच्छा, वस्तू स्वस्तात बनवणे आणि स्वस्तात विकणे. थोडक्यात काय - उपभोक्ता हा डिझाइन थिंकिंगच्या केंद्रस्थानी हवा
२. उपभोक्त्याच्या गरजा आणि त्याच्या समस्या नीटपणे समज़ुन घ्या
३. नंतर हवी असलेली वस्तू बनवण्याच्या आयडिया काढा
४. प्रोटोटाइप बनवा
५. प्रोटोटाइपचं भरपूर टेस्टींग करा. अपभोक्त्यांना भरपूर वापरू द्या, आढळलेल्या चुका दुरुस्त करत जा. हे सर्व झाल्यावरच ती वस्तू मोठ्या प्रमाणावर बनवा
तिसरं भाषण - Creative problem-solving in the face of extreme limits by Navi Radjou
सारांश -
नावी राडजू गेली पंचवीस वर्षं ‘जुगाड’ ह्या विषयाचा विचार करतोय. जुगाड म्हणजे कमी वेळात आणि कमी खर्चात सोडवलेला प्राॅब्लेम. त्याने ह्या भाषणात जुगाडची भरपूर उदाहरणं दिली आहेत उदा. मनसुख प्रजापतीचा वीज न वापरणारा मातीचा फ्रीज, आफ्रिकेतील सायकलचं चाक फिरवून मोबाइल रिचार्ज करायची कल्पना, पेरूसारख्या कमी पावसाच्या देशात रस्त्यावरच्या मोठमोठ्या जाहिरातीच्या बोर्डातून हवेतले बाष्प खेचून पाणी बनवायची कल्पना वगैरे वगैरे.
त्याने जुगाडचे तीन नियम सांगितले आहेत.
१. बनवायला अतिशय सोपा
२. स्थानिक संसाधनांचा उपयोग करूनच वस्तू बनवा. म्हणजे ती कमी वेळात आणि कमी खर्चात बनवता येईल
३. छोट्या छोट्या जागी वस्तू बनवा.
दिवस ६२
आजचा विषय (क्र. ०२/१०) समस्या सोडवण्याची क्षमता (problem-solving skill)
आणि आजचं ध्येय -
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. ह्या विषयावरचे mobile apps शोधणे आणि वापरायचा यत्न करणे
आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन.
तुमचा नम्र
आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे - वाचून काढल्या
२. ह्या विषयावरचे mobile apps शोधणे आणि वापरायचा यत्न करणे
ही ॲप्स शोधली
Forest
समस्या - आपण कामाच्या मधे सारखं सारखं मोबाईल उचलून व्हाॅटस्ॲप बघणं, यूट्यूब बघणं वगैरे करतो. कामावर लक्ष केंद्रीत करत नाही.
ही समस्या ह्या ॲपमुळे सुटते. ती अशी.
कुठलंही काम सुरू करण्यापूर्वी हे ॲप चालू करायचं आणि टायमर लावायचा. जर त्या वेळेपर्यंत मोबाईलला हात लावला नाहीत तर तुम्हाला मोबाईलवर एका झाडाचं चित्र दिसतं आणि एक नाणं तुमच्या खात्यात जमा होतं. अशी बरीच नाणी जमली की ही कंपनी तुमच्या नावानं एक खरंखुरं झाड लावते. हे ॲप वापरल्याने तुमच्या कामात लक्ष केंद्रीतही झालं आणि तुम्ही झाडं लावून जग सुंदरही केलं.
ह्या कंपनीने आतापर्यंत १५ लाखापेक्षा जास्त झाडं लावली आहेत. काय आयडिया आहे👍
I can’t wake up
समस्या - आपण पहाटेचा गजर लावतो. तो सकाळी वाजला की बंद करून परत झोपतो.
ही समस्या ह्या ॲपमुळे सुटते. ती अशी.
हे अॅप मोबाईलवर असलं की गजर बंद करण्यासाठी तुम्हाला हे ॲप एखादं काम देतं (उदा. एखादं सोपं गणित सोडवणं, एखादं कोडं सोडवणं, दोन शब्दांची जुळवणी करणं वगैरे) ज्यामुळे तुमची झोप उडायला मदत होते.
Pact: Fighting Laziness
समस्या - आपण काही करायचं ठरवतो पण ते करत नाही (व्यायाम करेन, डाएट करेन वगैरे). मग हळहळ वाटते.
ही समस्या ह्या ॲपमुळे सुटते. ती अशी.
तुमचं आठवड्याचं ध्येय ह्या ॲपमधे लिहायचं. ते झालं नाही तर दंड भरावा लागतो.
बाकी बरीच ॲप्स आहेत जी आपल्या समस्या सोडवू शकतात.
गूगल, यूट्यूब, कोरा वगैरे वगैरे. कूलर मधे पाणी कसं टाकावं ते कधी काय खावं ते अमुक झाड कसं उगवावं ….. सगळं जग आता आपल्या मदतीला आहे. 😘
दिवस ७२
आजचा विषय (क्र. ०२/१०) - समस्या सोडवण्याची क्षमता (problem solving skills)
आणि आजचं ध्येय -
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. हा विषय व्यापारात कसा वापरला गेला त्याच्या पाच गोष्टी (business stories) शोधणे
आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन.
तुमचा नम्र
आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे - वाचून काढल्या
२. हा विषय व्यापारात कसा वापरला गेला त्याच्या पाच गोष्टी (business stories) शोधणे
Airbnb
गर्दीच्या मोसमात हॅाटेलच्या खोल्या मिळत नाहीत. आणि हॅाटेलचं भाडं सगळ्यांना परवडत नाही. ह्या दोन समस्या Airbnb ने सोडवल्या. ज्या लोकांकडे न वापरणाऱ्या खोल्या आहेत त्या प्रवाशांना द्यायची कल्पना Airbnb ने शोधून काढली.
आज Airbnb सालाना ९ बिलियन डॅालरचा धंदा करते, तेही फक्त ७,००० कर्मचाऱ्यांना घेऊन. जगभरात ६० लाख घरं Airbnb ने उपलब्ध केली आहेत.
Apple mouse by IDEO
१९८० च्या दशकातली गोष्ट. स्टीव्ह जॅाब्सला त्याच्या लीझा संगणकासाठी mouse हवा होता. पण त्यावेळी मिळणारा mouse फार महाग होता (झेरॅाक्सचा mouse ३०० डॅालरला पडायचा). स्टीव्हला mouse १५ डॅालरला हवा होता. त्याने ही समस्या IDEO ह्या छोट्या कंपनीला सांगितली. त्यांनी हे काम फत्ते केलं.
M-Pesa
मोबाइल फोन-आधारित पैसे पाठवण्याची सेवा M-Pesa देते.
केनियातल्या व्होडाफोनची ही सेवा तिथल्या ९६% लोकसंख्येची गरज भागवते. केनियामधे बॅंका फार कमी. ह्या समस्येवरचा M-Pesa हा तोडगा.
Reliance Jio
Jio येण्यापूर्वी ही समस्या होती - कॅालला आणि डेटाला भरपूर पैसे लागत.
Jio ने २०१६ साली ह्या दोन्ही सेवा मोफत करून जगाला विस्मयचकित केलं. आज Jio सालाना ९०,००० कोटी कमवतं. हे कसं शक्य आहे?
Jio ने आधी देशभर डेटा नेटवर्क टाकलं (लांबी - अडीच लाख किलोमीटर)
मोफत सेवेमुळे त्यांना भरपूर ग्राहक मिळाले (४० कोटी). त्यांना Jio ने नवनवीन सेवा द्यायला सुरुवात केली उदा. जियो फायबर, जियो बिझनेस, जियो स्मार्टफोन, जियो wifi, १४ जियो ॲप्स इ.
ह्या सगळ्यातून नफा मिळवून पूर्वीचा तोटा भरून काढला.
Danfoss
ह्या डेनमार्कच्या कंपनीने ऊर्जा आणि प्रदूषण ह्या दोन जागतिक समस्या सोडवण्यात चांगला पुढाकार घेतलाय.
ऊर्जा-बचत उपक्रमांद्वारे, डॅनफॉसने संयुक्त राष्ट्र संघाला भरपूर योगदान दिलं आहे. United Nations Global Compact SDG Pioneer हा सन्मान संयुक्त राष्ट्राने त्यांना दिलाय
दिवस ८२
आजचा विषय (क्र. ०२/१०) समस्या सोडवण्याची क्षमता (problem-solving skills)
आणि आजचं ध्येय -
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. हा विषय समृद्ध करायला ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांना हुडकणे
आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन.
तुमचा नम्र
आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे - वाचून काढल्या
२. हा विषय समृद्ध करायला ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांना हुडकणे
Edwards Deming
PDCA (Plan-Do-Check-Act) ह्या तंत्राचा जनक. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने त्यांना जपानच्या प्रगतीसाठी खास बोलावून घेतलं.
Sakichi Toyoda
5Whys ह्या तंत्राचा जनक
Root Cause Analysis हे तंत्रसुद्धा ह्यानेच शोधले
ॲडा लवलेस
जगातली पहिली संगणक आज्ञावली (computer program) ह्या ताईंनी लिहिली
मुहम्मद युनूस
तारणाशिवाय बॅंक कर्ज देत नाही त्यामुळे गरीब जनता व्यापार करू शकत नाही आणि गरीबीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडू शकत नाही. ही समस्या युनूसने ग्रामीण बॅंक सुरू करून सोडवली. एका व्यक्तीला कर्ज न देता गटाला कर्ज देणे, महिला गटांना प्राधान्य देणे हे ह्या बॅंकेच्या यशाचं कारण आहे
काउरू इशिकावा
समस्येचे मूळ शोधून काढायला Fishbone Analysis करतात. ह्या तंत्राचा शोध इशिकावाने लावला
पुढच्या अभ्यासासाठी टिपून ठेवलेली ही बरीच नावं -
Richard Feynman, George Washington Carver, Edward De Bono
हजारो नावं आहेत ज्यानी समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळे शोध लावले. कुणाकुणाची नावं लिहू.
स्थानिक पातळीवरच्या समस्या कमी खर्चात/ श्रमात सोडवणारे आपल्याकडे लाखो लोक आहेत. ह्या पठ्ठ्यांमुळेच जुगाड हा आपला शब्द जगाच्या शब्दकोशांत आलाय.
दिवस ९२
आजचा विषय (क्र. ०२/१०) समस्या सोडवण्याची क्षमता (problem-solving skills)
आणि आजचं ध्येय -
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. ह्या विषयाच्या तज्ञाला कुठले प्रश्न विचारल्यास आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल हे शोधून त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढणे
आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन.
तुमचा नम्र
आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे - वाचून काढल्या
२. ह्या विषयाच्या तज्ञाला कुठले प्रश्न विचारल्यास आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल हे शोधून त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढणे.
प्रश्न खाली लिहिलेयत. उत्तरं फार मोठी होतील म्हणून ह्या पोस्टमधे फार लिहीत नाही.
२.१ समस्या सोडवणं म्हणजे काय आणि त्याच्या पायऱ्या कुठल्या आहेत?
व्याख्या - समस्येचं मूळ शोधण्याची आणि प्रभावी उपाय शोधण्याची क्षमता
वापरायची पद्धत -
प्रॅाब्लेम (समस्या) काय आहे ते व्यवस्थित लिहा
समस्या का निर्माण झाली ह्याचं मूळ कारण शोधून काढा
शोधलेलं मूळ कारण उपटून काढण्याचे जास्तीत जास्त उपाय लिहून काढा
प्रत्येक उपायाचे फायदे तोटे लिहून सर्व कागद
निर्णय घेणाऱ्याकडे सोपवा.
२.२ समस्या सोडवताना काय काय अडथळे येतात? आणि ते कसे पार करायचे?
अडथळ्यांची यादी - Lack of information or knowledge, Limited perspective or mindset, Emotional biases and subjective thinking, Fear of failure or making mistakes, Lack of creativity, Analysis paralysis, Lack of resources or constraints, Resistance to change
२.३ समस्या सोडवताना सृजनतेचा उपयोग कसा करावा?
२.४ तुमचा एखादा कठीण समस्या सोडवतानाचा अनुभव सांगू शकाल का?
२.५ समस्या सोडवण्याची काही प्रसिद्ध तंत्र कुठली आहेत?
The 5 Whys, PDCA (Plan-Do-Check-Act), SWOT Analysis, Pareto Analysis, Fishbone Diagram (Ishikawa Diagram), DMAIC, SCAMPER, Decision Matrix, Agile Problem-Solving, TRIZ
No comments:
Post a Comment